Corona Vaccine : लस न घेता बाजारात फिरल्यास दंड; ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांवर महापालिका करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 15:10 IST2021-06-04T15:09:08+5:302021-06-04T15:10:51+5:30
Corona Vaccine : या वयोगटातील दीड लाख नागरिकांची लस घेतली असलीतरी आणखी तीन लाख नागरिक लस घेण्यास शिल्लक राहिले आहे.

Corona Vaccine : लस न घेता बाजारात फिरल्यास दंड; ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांवर महापालिका करणार कारवाई
औरंगाबाद : महापालिकेकडे सध्या २० हजार लस शिल्लक असतानाही ४५ वर्षांवरील लाभार्थी लस घेण्यासाठी केद्राकडे फिरकत नसल्याचे चित्र पहायला मिळात आहे. लस न घेता बाजारात फिरणाऱ्या ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांवर आता महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी होत होती. लस घेण्यासाठी केंद्रावर रांगा लागत होत्या. त्यावेळी लसीचा पुरवठा कमी होत असल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांनी वाढवले. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास तीन महिने लस घेता येणार नसल्याचे जाहीर केले. दुसरा डोस ८४ दिवसांनी घ्यावा लागणार असल्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांची लस घेण्यासाठी होणारी गर्दी एकदम कमी झाली. या वयोगटातील दीड लाख नागरिकांची लस घेतली असलीतरी आणखी तीन लाख नागरिक लस घेण्यास शिल्लक राहिले आहे.
या संदर्भात मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, मनपाकडे सध्या २० हजार कोविशिल्ड लस शिल्लक आहे. परंतु लस घेण्यासाठी नागरिक येत नाहीत. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेता येतो. अद्यापही तीन लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसानंतर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांसाठी लस शिल्लक असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बाजारातील गर्दी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई
मागील दोन दिवसांपासून बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. आणखी काही दिवस अशीच गर्दी राहिली तर संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. लस न घेता बाजारात फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले.
टॉप फाइव्ह लसीकरण केंद्र :
केंद्राचे नाव - लस संख्या
एन-८ - २०,६८१
बन्सीलाल नगर - १८,५००
सिडको एन - १७,८९९
जिल्हा रुग्णालय - १४,७१४
छावणी - १२,६४८
सर्वांत कमी लसीकरण असलेले केंद्र :
केंद्राचे नाव - लस संख्या
शहाबाजार आरोग्य केंद्र - ५७६
जुना बाजार आरोग्य केंद्र - १२४५
गणेश कॉलनी आरोग्य केंद्र - १५४१
नेहरूनगर आरोग्य केंद्र - १८१७
गरम पाणी आरोग्य केंद्र - २०६९