Corona Vaccine : कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा; शहरात पाच हजार लस दीड तासातच संपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:28 IST2021-07-13T19:28:16+5:302021-07-13T19:28:41+5:30
Corona Vaccine shortage in Aurangabad : ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी लस घेेतली होती, त्यांना आता दुसरा डोस हवा आहे.

Corona Vaccine : कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा; शहरात पाच हजार लस दीड तासातच संपल्या
औरंगाबाद : शहरात लसची मागणी प्रचंड वाढली आहे. दुसऱ्या डोससाठी ७० हजारांहून अधिक नागरिक वेटिंगवर आहेत. केंद्र शासनाकडून लसचा पुरवठा मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी रात्री मनपाला फक्त ५ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. मंगळवारी सकाळी अवघ्या दीड ते दोन तासांत डोस संपले. बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. लसची गरज लक्षात घेता पहिला डोस काही दिवसांसाठी बंदच करण्याचा विचार आरोग्य विभागाने सुरू केला आहे. (Five thousand corona vaccines were end in the city in one and a half hours )
लोकसंख्येच्या प्रमाणात औरंगाबाद शहराला लस उपलब्ध करून दिली जात आहे. शहरात दररोज २० हजार लस देण्याची यंत्रणा मनपाने उभी केली. शासनाकडून साठा उपलब्ध होत नसल्याने ११५ पैकी ३९ ते ४० लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात येत आहेत. आठवड्यातून एक किंवा दोन वेळेसच लसीकरण होत आहे. ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी लस घेेतली होती, त्यांना आता दुसरा डोस हवा आहे.
दुसऱ्या डोससाठीच राखीव ठेवण्याचा विचार
महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लागतात. प्रत्येक केंद्राला फक्त १५० लस देण्यात येत असून, सकाळी टोकन मिळविण्यासाठी रांगा लागत आहेत. लस न मिळाल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. मनपा प्रशासनाने अनेकदा शासनाकडे वाढीव प्रमाणात लस द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. यापुढे शासनाकडून उपलब्ध होणारी लस फक्त दुसऱ्या डोससाठीच राखीव ठेवण्याचा विचार मनपा करीत आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.