संकट गडद होतेय; मराठवाड्यात ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 14:00 IST2020-09-03T13:57:13+5:302020-09-03T14:00:36+5:30
मराठवाड्यात आजवर १७९९ जणांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्यामुळे झाला असून, यामध्ये ९६८ जण ग्रामीण भागातील आहेत.

संकट गडद होतेय; मराठवाड्यात ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात
औरंगाबाद : कोरोना आता ग्रामीण भागात वाढतो आहे. मराठवाड्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात ६० टक्के रुग्ण असून, संकट अधिक गडद होत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मिशन बिगिनच्या चौथ्या टप्प्यात सर्व व्यवहारांना परवानगी मिळाल्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे मत आहे.
मराठवाड्यात आजवर १७९९ जणांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्यामुळे झाला असून, यामध्ये ९६८ जण ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागातील ८३१ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील ग्रामीण भागात जास्त आहे.ग्रामीण आरोग्य व्यवस्था तोकडी आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारी, क्वारंटाईन सेंटर्स, सीसीसीबाबत प्रशासनाने वारंवार बैठक, पाहणी व सूचना करून यंत्रणा अद्ययावत करण्याचे प्रयत्न केले असले तरी औरंगाबादला रुग्ण येत आहेत. त्यामुळे येथे आयसीयू बेडस् उपलब्ध होत नसल्याची ओरड होत आहे. डॉक्टर्स स्वेच्छानिवृती मिळावी यासाठी प्रशासनाकडे अर्ज करू लागले आहेत. औषधी तुटवड्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. गेल्या महिन्यात घाटीतून डॉक्टरांची टीम मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाठविण्यात आली होती. यासारखी अनेक प्रकरणे असून, प्रशासन हवालदिल होत चालले आहे. विभागात मृत्यूचे प्रमाण ३.५ टक्क्यांवर आले आहे. ७१.५१ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. १०.८८ टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण आहे.
आकडे बोलतात...
जिल्हा शहरी रुग्ण ग्रामीण रुग्ण एकूण
औरंगाबाद १५५०५ ८४९४ २३९९९
नांदेड २८७२ ३८६६ ६७३८
परभणी १३४८ १३०८ २६५६
लातूर ३३६८ ५०६४ ८४३२
जालना ०० ४९३८ ४९३८
बीड ०० ४७०५ ४७०५
हिंगोली ०० १५१३ १५१३
उस्मानाबाद ०० ५९२५ ५९२५
एकूण २३०९३ ३५८१३ ५८९०६