corona in Aurangabad : रेमडेसिविर इंजेक्शन चोर पालिकेतीलच ?; स्टोअर विभागातील ५ जणांना कारणे दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 13:44 IST2021-04-29T13:41:02+5:302021-04-29T13:44:43+5:30
remdesivir black marketing महापालिकेने बंगळुरू येथील मायलँन कंपनीकडून १० हजार रेमडेसिविरची खरेदी केली होती. हा साठा महापालिकेच्या भवानीनगर येथील स्टोअर रूममध्ये ठेवला होता.

corona in Aurangabad : रेमडेसिविर इंजेक्शन चोर पालिकेतीलच ?; स्टोअर विभागातील ५ जणांना कारणे दाखवा
औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. भवानीनगर येथील स्टोअरमधून इंजेक्शन्स चोरीला गेल्याचे प्रथमदर्शनी प्रशासनाला वाटत आहे. या संशयाच्या सुईमुळेच स्टोअर विभागातील ५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा सर्वांना नोटीस प्राप्त झाली. १७ एप्रिल रोजीच ''लोकमत''ने महापालिकेच्या मॅल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये गरजेपेक्षा जास्त रेमडेसिविरचा वापर होत असल्याचे उघडकीस आणले होते.
महापालिकेने बंगळुरू येथील मायलँन कंपनीकडून १० हजार रेमडेसिविरची खरेदी केली होती. हा साठा महापालिकेच्या भवानीनगर येथील स्टोअर रूममध्ये ठेवला होता. २० एप्रिल रोजी या स्टोअरमधून मेल्ट्रोन हॉस्पिटलला १२६२ इंजेक्शन्स पाठविण्यात आली. एका बॉक्समध्ये ४८ इंजेक्शन्स असलेले एकूण २६ बॉक्स पाठविण्यात आले. एका खुल्या डब्यात १४ इंजेक्शन्स होती.
मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील फार्मासिस्टने २३ एप्रिल रोजी रेमडेसिविर इंजेक्शनची तपासणी केली, तेव्हा एका बॉक्समध्ये रेमडेसिविर इंजेक्शनऐवजी एमपीएस नावाचे दुसरेच इंजेक्शन ठेवण्यात आले होते. एका खोक्यात ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्स नसून त्याऐवजी दुसरीच इंजेक्शन्स असल्याची बाब फार्मासिस्टने रुग्णालयाच्या प्रमुखांना त्वरित सांगितली.
महापालिकेकडून प्राथमिक तपासणी
२३ एप्रिल रोजी ४८ इंजेक्शन्स चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर भांडार विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण राठोडकर त्यांनी मेल्ट्रॉन रुग्णालयात आणि भवानीनगर येथील स्टोअरमध्ये जाऊन कसून तपासणी केली. मात्र इंजेक्शन्स सापडली नाहीत. यानंतर वरिष्ठांना घटनेची माहिती देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासकांनी इंजेक्शन वाटपातील सहभागींना कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय घेतला.
एमपीएस इंजेक्शन महापालिकेनेच खरेदी केलेले
मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या एमपीएस इंजेक्शनचा बॅच क्रमांक तपासला असता, तो साठा महापालिकेनेच खरेदी केला असल्याचे समोर आले. म्हणजेच भवानीनगर येथील स्टोअर रूममध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.
या ५ जणांना नोटीस...
भांडार विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण राठोडकर, औषध निर्माण अधिकारी व्ही. डी. रगडे, प्रणाली कोल्हे, दीपाली दाणे, आरोग्य सहायक अनंत देवगिरीकर या ५ जणांचा यात समावेश आहे. प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे जाहीर केले. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांना नोटीस मिळाली नव्हती. मात्र या प्रकरणात गरज पडली तर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल, असे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.
''लोकमत'' ने व्यक्त केला होता संशय
शहरात रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकत असताना महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दररोज ३५० पैकी ३०० रुग्णांना इंजेक्शन देण्यात येत आहेत, या प्रकारावर ''लोकमत''ने १७ एप्रिलच्या अंकात संशय व्यक्त केला होता.