corona in Aurangabad : अबब... दोनशेवर रुग्ण घरीच ‘ऑक्सिजन’वर, सिलिंडरसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 12:46 IST2021-04-21T12:46:02+5:302021-04-21T12:46:47+5:30
corona in Aurangabad : रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेले, न्यूमोनिया, दमा, दीर्घकालीन श्वसनाचे आजार, फुप्फुसात पाणी झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी झाल्यास रुग्णास कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते.

corona in Aurangabad : अबब... दोनशेवर रुग्ण घरीच ‘ऑक्सिजन’वर, सिलिंडरसाठी धावपळ
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात औरंगाबादेत तब्बल दोनशेवर रुग्ण सध्या घरातच ऑक्सिजन सिलिंडरवर आहेत. कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना निगेटिव्हसह श्वसनाशी निगडित रुग्णांचा यात समावेश आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या घरी ऑक्सिजन सिलिंडर वापरण्याच्या प्रमाणात दुप्पट झाली आहे.
विविध आजारांमध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेले, न्यूमोनिया, दमा, दीर्घकालीन श्वसनाचे आजार, फुप्फुसात पाणी झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी झाल्यास रुग्णास कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते. अशा अवस्थेत रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. परंतु रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही अनेकांना घरीही ऑक्सिजन सिलिंडर लावावा लागत आहे. अनेक कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे घरी ऑक्सिजन सिलिंडर वापरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते.
होम आयसोलेशमध्ये १९९८ रुग्ण
औरंगाबादेत कोरोनाचे १९९८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. घरात स्वतंत्र रूम, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली जाते. या रुग्णांवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जाते. यातील अनेक रुग्णही घरी ऑक्सिजनवर आहेत.
रोज ५ ते ६ सिलिंडर
ऑक्सिजन सिलिंडर एजन्सीचे सुजीत जैन म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरी रोज २ ते ३ सिलिंडर दिले जात होते. आता हे प्रमाण रोजचे ५ ते ६ झाले आहे. डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोणालाही सिलिंडर दिले जात नाहीत. सध्या जवळपास २०० रुग्णांसाठी लहान आणि जम्बो सिलिंडर दिलेले आहेत.
रोज सिलिंडर
कोरोनावर उपचार घेऊन नातेवाईक घरी परतले आहेत. परंतु त्यांना ऑक्सिजन द्यावे लागत आहे. त्यासाठी रोज ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे. आतापर्यंत काही अडचण आली नाही.
- गौरव भिंगारे, एन-११
१० दिवसांपासून सिलिंडर नेतो
घरातील सदस्यांसाठी १० दिवसांपासून ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जात आहे. एक जम्बो सिलिंडर घेऊन गेल्यानंतर जवळपास १४ तास चालतो. त्यानंतर परत सिलिंडर घेऊन जावा लागतो.
- कलीम खान, प्रिया काॅलनी
मोठ्या सिलिंडरची गरज
घरातील नातेवाईकासाठी छोटे सिलिंडर घेऊन जातो. हे सिलिंडर मिळण्यास सध्या कोणतीही अडचण नाही. जम्बो सिलिंडरची मागणी केली आहे.
- सोहेल खान