बोकाळलेल्या प्री-प्रायमरी शाळांवर आता नियंत्रण येणार; नोंदणी अनिवार्य होणार
By राम शिनगारे | Updated: March 29, 2025 15:34 IST2025-03-29T15:33:53+5:302025-03-29T15:34:16+5:30
शालेय शिक्षण विभाग तपासणीही करणार

बोकाळलेल्या प्री-प्रायमरी शाळांवर आता नियंत्रण येणार; नोंदणी अनिवार्य होणार
राम शिनगारे, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: कोणत्याही गल्लीबोळात गेल्यानंतर प्री-प्रायमरी स्कूल्सनी धुमाकूळ घातलेला आहे. त्याठिकाणी अतिशय लहान बालके शिकण्यासाठी येतात. मात्र, त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा, शुल्कांचे नियमन करणारी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्व प्राथमिक हा एक टप्पा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच शालेय शिक्षण विभागाकडून प्री-प्रायमरी स्कूलची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याविषयीचा निर्णय झाला असून, अंमलबजावणीलाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. नव्या धोरणानुसार शालेय शिक्षणाची रचना पहिली ते दहावी आणि अकरावी ते बारावी ही बदलण्यात आली आहे.
अंगणवाडीचे शालेय विभागाकडे हस्तांतरण का?
अंगणवाड्यांचे नियंत्रण महिला व बालकल्याण विभागाकडे होते. मात्र, आता पूर्व प्राथमिक शिक्षण हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा भाग बनले आहे. त्यामुळे खासगी व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे होणार आहे. त्यामुळे अंगणवाडीचेही हस्तांतरण शालेय शिक्षण विभागाकडे करण्याच्या हालचाली उच्चस्तरावर सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शाळांची नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे करावी
पूर्व प्राथमिक शिक्षण हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत शिक्षण म्हणून असेल. त्यामुळे हे शिक्षण देणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे करावी लागेल. त्यासाठी ॲप आहे. त्यामुळे आतापर्यंत विनानोंदणी चालणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळांवर शालेय शिक्षण विभागाचे नियंत्रण राहणार आहे.
अशी असेल नवीन रचना
- पायाभूत स्तर हा ३ ते ८ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. त्यात पूर्व प्राथमिकसाठी ३ ते ६ वयोगट असेल आणि ६ ते ८ या वयोगटात दुसरीपर्यंतचे विद्यार्थी असतील.
- दुसरा स्तर हा पूर्वाध्ययन स्तर असून, त्यात ८ ते ११ वर्षांतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्यात तिसरी ते ५ वीपर्यंतचे विद्यार्थी असतील.
- तिसरा स्तर हा पूर्व प्राथमिक शाळेचा आहे. त्यात ११ ते १४ वयोगटातील सहावी ते आठवीचे विद्यार्थी असतील.
- शेवटचा स्तर हा माध्यमिक असेल. त्यात १४ ते १८ वयोगटाचा समावेश असून, नववी ते १२वीच्या वर्गाचा समावेश आहे.