बीडबायपास रस्ता, जलवाहिनी, पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराची ६९ लाखांची फसवणूक
By सुमित डोळे | Updated: March 6, 2025 19:31 IST2025-03-06T19:30:51+5:302025-03-06T19:31:13+5:30
मुंबईच्या कृ़पाय इंडस्ट्रिज च्या चार संचालकांवर गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग

बीडबायपास रस्ता, जलवाहिनी, पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराची ६९ लाखांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : बीडबायपासच्या संपूर्ण कामाचा ठेका घेतलेल्या जीएनआय इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीची ६९ लाख ७२ हजारांची फसवणूक झाली. याप्रकरणी मुंबईच्या कृ़पाय इंडस्ट्रिजच्या पायल दर्शन शाह, प्रदिप रजनिकांत शाह, रमिला प्रदिप शाह व दर्शन शहा (रा. मुंबई) या संचालकांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंदरसिंग बिंद्रा (४६, रा. ज्योतीनगर ) यांच्यासह त्यांचे वडिल व काका जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक आहेत. त्यांचे नातेवाईक व मंजित कॉटनचे संचालक राजेंद्रसिंग यांच्यासोबतच्या भागिदारीत एमसीजीएन रोडवेज एलएलपी ही फर्म स्थापन केली आहे. या फर्मद्वारे त्यांनी काही वर्षांपूर्वी झाल्टा फाटा ते महानुभव आश्रम रस्ता बांधणे, त्यावरील पुल व जलवाहिनी टाकण्याचे काम त्यांना मिळाले हाेते. त्यासाठी आवश्यक २२०० मिटर एम.एस. वेल्डेट पाईपसाठी त्यांनी १७,१०० रुपये प्रती मिटरप्रमाणे कृपाय इंडस्ट्रिज कंपनीला काम दिले होते. २० टक्के अॅडव्हॉन्स प्रमाणे बिंद्रा यांनी ३२ लाख २८ हजार रुपये पाठवल्यानंतर पुरवठा सुरू झाला. विश्वास बसल्याने त्यांनी आणखी ११ लाख ८० हजार रुपये आरोपी कंपनीला अदा केले. त्यानंतर आणखी १६०० मिटर चे पाईप पाठवण्यास सांगितले. ९ फेब्रुवारी, २़०२३ पर्यंत बिंद्रा यांनी आरोपींना ३ कोटी ५९ लाख ५७ हजार रुपये पाठवले. त्यापैकी २ कोटी ६४ लाख़ १२ हजारांचे एकूण १३०८ पाईपचा त्यांनी पुरवठा केला होता.
उडवाउडीवीचे उत्तरे, खर्चही वाढवला
शाह यांनी फेब्रुवारी, २०२३ नंतर पुरवठा करणे बंद केले. ७५ टक्के आगाऊ रक्कमेची मागणी केली. बिंद्रा यांनी त्यांना त्यांच्याकडेच जमा रक्कमेबाबत सांगितले. तरीही दर्शनने वडिल आजारी असल्याचे कारण सांगितले. १५ मे ते ९ ऑगस्ट, २०२३ दरम्यान त्याने कच्चा मालाचा पुरवठा केला. मात्र, तोही दामदुप्पट दराने पुरवून २४ लाख ६८ हजार रुपये खर्च दाखवला. वारंवार मागणी करुन त्याने मार्च, २०२४ मध्ये २ लाख रुपये पाठवले. मात्र, जलवाहिण्यांचा पुरवठा नकार देत ६९ लाख ७२ हजार रुपये बुडवले. वर काॅल न करण्यासाठी धमकी देखील दिली. निरीक्षक संग्राम ताठे यांनी गुन्हा दाखल करुन आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केला.