मीटर तपासणीत अनेक बाबी पुढे
By Admin | Updated: July 13, 2017 00:20 IST2017-07-13T00:19:23+5:302017-07-13T00:20:53+5:30
हिंगोली : शहरातील विविध भागात पालिकेने १२ हजार ५०० नळांना मीटर बसविले आहे. येत्या काही दिवसांत २४ घंटे नळाला पाणी सोडण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

मीटर तपासणीत अनेक बाबी पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील विविध भागात पालिकेने १२ हजार ५०० नळांना मीटर बसविले आहे. येत्या काही दिवसांत २४ घंटे नळाला पाणी सोडण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यानुषंगाने शहरातील एका भागाचे परीक्षण घेण्यासाठी एमजीपीने तपासणीस सुरुवात केली असता, अनेकजण मीटर बाजूला ठेवून तर, कायमचे मीटर घरात ठेवत पाणी भरत असल्याचे उघडकीस आले.
नगरपालिकेने आता पाणीपुरवठा योजनेकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी आधीच मीटर बसविले आहेत. तरीही अनेकजण पाणी मनमानी पद्धतीनेच वापरतात. विशेष म्हणजे काहींनी तर मीटरच काढून टाकले. काहींनी ते उलट्या बाजूने बसविले. इतरही अनेक प्रकार केल्याचे समोर येत आहे. शहरात नळाला २४ घंटे पाणी उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालिकेतर्फे नळाला मीटर बसविण्याचे काम एका कंपनीला दिले होते. कंपनीने शहरात तब्बल १२ हजार ५०० मीटर बसविले असता २ हजार ५०० नळांचे मीटर काढून टाकण्यात आल्याचे एमजीपीच्या सर्वेक्षणात आढळून आले. तर एक भाग पूर्ण करण्यासाठी जिजामातानगरची निवड केली असता, त्या ठिकाणी एकूण ४२७ मिटर बसवले होते. मात्र २०८ ठिकाणीच नळाला मीटर दिसले. तर काहींचे रिडींग शून्य असल्याचे दिसून आले. १४१ मीटर घरात काढून ठेवल्याचे आढळून आले. तर नागरिकांच्या चर्चेतून वेगळ्याच बाबी पुढे आल्या. काही जण म्हणतात, मीटरमुळे पाणी कमी येते, पाण्याच्या हवेनेच मीटर फिरते, अशी एक ना अनेक कारणे सांगितली जात आहेत.