बोगस जात प्रमाणपत्राआधारे मनपा निवडणूक लढविली

By Admin | Updated: March 26, 2016 00:57 IST2016-03-26T00:33:35+5:302016-03-26T00:57:05+5:30

औरंगाबाद : बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरी यांच्याविरुद्ध जिन्सी ठाण्यात बुधवारी अखेर गुन्हा नोंदविण्यात आला.

The contesting election was done by a bogus caste certificate | बोगस जात प्रमाणपत्राआधारे मनपा निवडणूक लढविली

बोगस जात प्रमाणपत्राआधारे मनपा निवडणूक लढविली


औरंगाबाद : बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरी यांच्याविरुद्ध जिन्सी ठाण्यात बुधवारी अखेर गुन्हा नोंदविण्यात आला. इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या वॉर्ड क्र. १९, आरेफ कॉलनीतून जमीर कादरी यांनी छप्परबंद जातीच्या बोगस प्रमाणपत्रावर निवडणूक लढविली होती.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २०१५ मध्ये झालेल्या मनपाच्या निवडणुकीत आरेफ कॉलनी हा वॉर्ड इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होता. उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांना जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. त्यावेळी जमीर अहेमद रहीम अहेमद कादरी (रा. मकसूद कॉलनी) यांना एमआयएमने उमेदवारी दिली आणि त्यांनी छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर क रून निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते विजयही झाले. मात्र, कादरी यांचे जात प्रमाणपत्र बोगस आहे, याची कुणकुण तेथील अपक्ष उमेदवार वाहेद अली (रा. दिलरस कॉलनी) यांना लागली. त्यांनी मग कादरी यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत माहिती अधिकारात माहिती जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा असे समोर आले की, १६ डिसेंबर ८९ किंवा १६ डिसेंबर ९९ यापैकी एकाच तारखेचे तहसील कार्यालयातून काढलेले छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र जमीर कादरी यांनी सादर केले होते. ते तहसीलदारांनी प्रमाणित केलेले होते; परंतु फिर्यादी वाहेद अली यांनी माहिती अधिकारात जेव्हा तहसील कार्यालयातून माहिती मागविली, तेव्हा तहसीलदारांनी स्पष्ट केले की, त्या कालावधीत, त्या क्रमांकाचे प्रमाणपत्र जमीर कादरी यांना तहसील कार्यालयातून देण्यात आलेले नाही. त्यावरून हे स्पष्ट झाले की, जमीर कादरी यांनी तहसीलदारांचे बोगस शिक्केतयार करून स्वत:च छप्परबंद जातीचे बोगस जात प्रमाणपत्र तयार केले आणि ते जात वैधता पडताळणी समितीकडून वैध करून घेऊन त्याआधारे निवडणूक लढविली. माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाल्यानंतर वाहेद अली यांनी जमीर कादरी यांचे नगरसेवकपद रद्द करावे आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी न्यायालयात केली आहे. बुधवारी जिन्सी ठाण्यात नगरसेवक जमीर कादरीविरुद्ध ४२०, ४०६, ४६८, ४७१, ४७३, १९९, २०० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.

Web Title: The contesting election was done by a bogus caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.