कंटेनरची कारला धडक, तीनजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:50 IST2019-01-11T18:50:00+5:302019-01-11T18:50:25+5:30
नगरकडे जाणाऱ्या कारला नगर-औरंगाबाद महामार्गावरील बजाज मटेरियल गेटसमोर कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कारमधील पाचपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, दोघे किरकोळ जखमी आहेत.

कंटेनरची कारला धडक, तीनजण गंभीर जखमी
वाळूज महानगर : नगरकडे जाणाऱ्या कारला नगर-औरंगाबाद महामार्गावरील बजाज मटेरियल गेटसमोर कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कारमधील पाचपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, दोघे किरकोळ जखमी आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
गंगापूर तालुक्यातील शिवराई येथील संजय गोविंद साबळे, केशव गिरीजाराम साबळे, हरिभाऊ तुकाराम साबळे, मच्छिंद्र सखाराम साबळे व गोरख भावराव नेव्हाळ हे माहुरदेवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास कारने निघाले. औरंगाबाद-नगर महामार्गावरुन माहुरकडे जात असताना बजाज आॅटो कंपनीच्या मटेरियल गेटसमोर कंटनेरने बजाज कंपनीकडे जाण्यासाठी अचानक वळण घेतले. याचवेळी कारला जोराची धडक बसली.
यात कार चालक संजय गोविंदराव साबळे (४०), गोरख भावराव नेव्हाळ (४५), केशव गिरीजाराम साबळे (४५), हरिभाऊ पुंजाराम साबळे (६०) व मच्छिंद्र सखाराम साबळे (५०) हे गंभीर जखमी होऊन कारमध्ये अडकले होते. जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. सहायक फौजदार आर.डी.वडगावकर, पोहेकॉ.काकासाहेब जगदाळे यांनी घटनास्थळ गाठुन अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत केली.
अपघात सत्र सुरुच
औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात सत्र सुरुच असल्याने वाहनधारक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पंढरपूरातील तिरंगा चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार झाला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या महामार्गावर दुतर्फा जडवाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून लहान-मोठे अपघात सतत घडत आहेत.