जिल्हा कचेरीवर भाकपचा मोर्चा
By Admin | Updated: August 17, 2014 00:12 IST2014-08-17T00:12:30+5:302014-08-17T00:12:30+5:30
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

जिल्हा कचेरीवर भाकपचा मोर्चा
परभणी : दुष्काळ जाहीर करताना वापरण्यात येणारा ब्रिटिशकालीन आणेवारी हा निकष कालबाह्य व अशास्त्रीय असल्याने तो रद्द करावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
शनिवार बाजार येथून सुरू झालेल्या या मोर्चास स्वा़सै़ कॉ़ सय्यद आझम यांनी हिरवा झेंडा दाखविला़ जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहचल्यानंतर तेथे जाहीर सभेत विसर्जित करण्यात आला़ पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरूद्ध कारवाई करावी, रोहयो कामे व थकीत मजुरी अदा करावी, मागणी करूनही काम न मिळालेल्या पेडगाव, सावळी, भोसी येथील मजुरांना बेरोजगार भत्ता द्यावा, लोअर दूधना लाभक्षेत्रातून वगळलेल्या धामणगाव, देऊळगाव गात या गावांसाठी विशेष उपसा सिंचन योजना द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या़ दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे जाहीर करून शासन दुष्काळग्रस्त जनतेची थट्टा करीत असल्याचा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला़ दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रिटिशकालीन आणेवारी हा निकष कालबाह्य असून, त्यामुळे पूर्वीच्या दुष्काळात देखील जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळी यादीत आली नव्हती़ तर हजारो गारपीटग्रस्तांना मदतीपासून वंचित रहावे लागले़ त्यामुळे आणेवारीची पद्धत रद्द करावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी यावेळी केली़ या आंदोलनाचे नेतृत्व कॉ़ राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, अॅड़ लक्ष्मण काळे, आसाराम बुधवंत, लक्ष्मण घोगरे, सखाराम मगर, तुकाराम शिंदे, सय्यद इब्राहीम, गणपत गायकवाड, संदीप सोळंके, नामदेव वैद्य, मंगला खामगावकर, अनिता घोंगडे, विश्वंभर देशमुख, अप्पा कुराडे, शेख अब्दुल, गुलाब पौळ आदींनी केले़ (प्रतिनिधी)