औरंगाबादकरांना दिलासा ! ब्रिटनमधून आलेल्या ५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 12:42 IST2020-12-24T12:40:15+5:302020-12-24T12:42:20+5:30
coronavirus in Aurangabad : राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात काही दिवसांत ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगाबादकरांना दिलासा ! ब्रिटनमधून आलेल्या ५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह
औरंगाबाद : ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे ब्रिटनमधून औरंगाबादेत परतलेल्या ७ नागरिकांची मनपाने आरटीपीसीआर तपासणी केली. यात ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांचे अहवाल रात्री उशिरा मिळणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. तर वाळूज येथील नागरिकांची ॲन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली असून, आरटीपीसीआर तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती जि. प. च्या आरोग्य विभागाने दिली.
ब्रिटनमध्ये आढळलेला काेरोनाचा नवा विषाणू ७० पट वेगाने पसरतो. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात काही दिवसांत ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांची माहिती मिळविली. ब्रिटन येथून परतलेले हे नागरिक सध्या कुठे आहेत, याचा शोध घेण्यात आला. तेव्हा ९ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेला यश आले. यातील एक नागरिक बुलढाण्याकडे रवाना झाला आहे. दुसरा नागरिक वाळूज परिसरात राहत आहे. उर्वरित ७ नागरिक शहरात वास्तव्याला आहेत. त्यांची मनापाकडून आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यातील ५ जणांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
प्रवासी क्वारंटाईन
वाळूज येथील रहिवासी असलेल्या प्रवाशाचा ॲन्टीजेन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल गुरुवारी सकाळी मिळणार आहे. या प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात आले आहे.