काँग्रेसची वृत्ती चुकीची! दानवेंकडून बिहार पराभवाचे विश्लेषण; महाविकास आघाडीत खदखद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:48 IST2025-11-14T16:45:53+5:302025-11-14T16:48:54+5:30
'काँग्रेसची जास्त मागणी, कमी विजय'; अंबादास दानवेंनी बिहारच्या निकालावरून फटकारले, बिहार निकालानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत खदखद उघड

काँग्रेसची वृत्ती चुकीची! दानवेंकडून बिहार पराभवाचे विश्लेषण; महाविकास आघाडीत खदखद!
छत्रपती संभाजीनगर: बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या झालेल्या पराभवानंतर याचे खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी बिहार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या पराभवास थेट काँग्रेस पक्षाच्या जागावाटपाच्या मानसिकतेवर बोट ठेवले. दानवे यांनी खदखद जाहीरपणे व्यक्त केल्याने याचे परिणाम राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये एनडीएला २०० जागांवर स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निश्चित झाल्यानंतर दानवे यांनी वृत्तवाहिनीवर बोलताना काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. दानवे यांनी बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेस आणि आरजेडीच्या चुकांवर फोडले. "पराभव झालेला मान्य आहे, भाजपने सत्तेचा गैरवापर केला हे खरं आहे. पण, त्याचबरोबर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला खूप उशीर झाला," अशी कबुली त्यांनी दिली.
काँग्रेसच्या वृत्तीमुळेच इतर मित्रपक्षांचे नुकसान
काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका करताना दानवे म्हणाले, "काँग्रेसचं असंच आहे; जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा, मोठा वाटा हवा असतो, पण प्रत्यक्षात विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं." काँग्रेसच्या या वृत्तीमुळेच इतर मित्रपक्षांचे नुकसान होते, असे मत त्यांनी परखडपणे मांडले. बिहारमधील जागावाटपाचा घोळ आणि महाराष्ट्रातील मागील निवडणुकीतील धोरणांवर त्यांनी थेट तुलना केली. दानवे म्हणाले, "महाराष्ट्रात निवडणुकीवेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले असते आणि जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते. जी चूक महाराष्ट्रामध्ये झाली तीच चूक बिहारमध्येही झाली आहे. काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी."
जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नको!
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी टिकून राहावी, अशी इच्छा व्यक्त करत असतानाच त्यांनी जागावाटपाच्या वेळकाढूपणावर नाराजी व्यक्त केली. "छोट्या गावांमध्येही जर जागावाटपाची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालत असेल तर निवडणुकीतली मजा निघून जाते आणि त्याचा परिणाम निकालावर होतो. काँग्रेसवाले मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना थेट 'पंजावर (काँग्रेसच्या चिन्हावर) लढा' सांगतात, हे योग्य नाही. जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नसायला पाहिजे'', असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.