महाविकास आघाडीचा काँग्रेस पाठिंबा काढणार; रामदास आठवलेंचे भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 01:37 PM2020-12-30T13:37:34+5:302020-12-30T13:39:03+5:30

Congress to withdraw support Mahavikas Aghadi यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल

Congress to withdraw support Mahavikas Aghadi; Ramdas Athavale's prophecy | महाविकास आघाडीचा काँग्रेस पाठिंबा काढणार; रामदास आठवलेंचे भाकीत

महाविकास आघाडीचा काँग्रेस पाठिंबा काढणार; रामदास आठवलेंचे भाकीत

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार

औरंगाबाद : यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे, अशी मागणी खा. संजय राऊत करीत आहेत. त्यांच्या या मागणीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यायला काँग्रेस तयार आहे, असे वाटत नाही. या मुद्यावर काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याचे मत रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. हे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत त्यांनी केले.
मी पुन्हा येईन, असे फडणवीस कुणाच्या जोरावर म्हणतात तर अजित पवारांच्या जोरावर. ते दोघे एक दिवसासाठी एकत्रित आले होते. आता यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल आणि हे दोघे एकत्रित येऊन पुन्हा सरकार स्थापन करू शकतात, असे आठवले म्हणाले.

गेल्या वर्षभरापासून शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेली आहे. ती यूपीएमध्येपण नाही. तरी शिवसेनेचे संजय राऊत हे शरद पवार यांना यूपीएचे नेतृत्व दिले जावे, अशी मागणी करीत आहेत. शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे; पण इतिहास पाहिल्यास काँग्रेसने सतत अन्याय केला आहे. त्यांना कधी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ दिले नाही. मनमोहनसिंग यांच्याऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला पाहिजे होते; पण तसे घडले नाही. आता काँग्रेस त्यांना यूपीएचे अध्यक्षपद देईल, असे वाटत नाही. या मुद्यावरून काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, आजपर्यंत कायदेच रद्द करा असे कुणी सांगितले नाही. हे संविधान विरोधी होय. कायद्यात दुरुस्तीची मागणी होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्हीही नामांतरासारखा लढा लढलेलो आहोत; परंतु समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढला. काही शेतकरी नेते आंदोलन भडकवीत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

रिपब्लिकन ऐक्याची शक्यता नाही, असे सांगत, गेल्या १९९८ पासून माझ्याशी प्रकाश आंबेडकर बोलत नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला बाबूराव कदम, दौलत खरात, मिलिंद शेळके, कांतीकुमार जैन, पप्पू कागदे, किशोर थोरात, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.

आता नो कोरोनाचा नारा..
कोरोना सुरू झाला तेव्हा मी ‘गो कोरोना...कोरोना गो’ असा नारा दिला होता. आता माझा नारा ‘नो कोरोना...कोरोना’ असा आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

Web Title: Congress to withdraw support Mahavikas Aghadi; Ramdas Athavale's prophecy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.