काँग्रेस काळापासूनच जिल्ह्याचे अच्छे दिन - अशोकराव
By Admin | Updated: September 26, 2014 00:44 IST2014-09-26T00:38:47+5:302014-09-26T00:44:10+5:30
नांदेड : दिवंगत नेते शंंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यात अच्छे दिन अनेक वर्षापासून आहेत़ हे अच्छे दिन जनता अद्याप विसरली नाही़

काँग्रेस काळापासूनच जिल्ह्याचे अच्छे दिन - अशोकराव
नांदेड : दिवंगत नेते शंंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यात अच्छे दिन अनेक वर्षापासून आहेत़ हे अच्छे दिन जनता अद्याप विसरली नाही़ आज काही लोक अच्छे दिनचा नारा देत असले तरी ते विभाजन करणारे आहेत़ विकासापासून दूर नेणाऱ्या अशा विभाजनवादी लोकांना थारा देवू नका असे आवाहन माजी मुख्यमंत्री, खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख बुथस्तरीय युवकांचा मेळावा गुरूवारी शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात घेण्यात आला़ यावेळी खा़ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले़ युवक काँग्रेसला पक्षात मानाचे स्थान आहे़ पक्षात सर्वच पातळीवर युवकांना संधी दिली जात आहे़ युवकांनी विकासाच्या संकल्पना मांडाव्यात़ त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाददारी खासदार म्हणून मी घेईन असेही त्यांनी स्पष्ट केले़ तरूणांचे प्रश्न पक्षपातळीवर सोडविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले़ आगामी काळातही युवकांना संधी दिली जाणार आहे़ पक्षांतराच्या घडामोडीवर चव्हाण यांनी ‘गेले ते कावळे राहिले ते मावळे’ या शब्दात प्रतिक्रिया दिली़
संघटीत राहिलात तरच विकासाची फळे चाखता येतील़ विभाजन झाले तर मात्र नुकसानच होणार आहे़ गावातील लहान-मोठ्या कारणांवरून मतभेद झाले तर ते गावपातळीवरच संपुष्टात आणावेत़ तंटे वाढले तर विकास खुंटणार आहे़ फूट पाडणाऱ्यांना गावात येवू देवू नका असे आवाहनही त्यांनी युवकांना केले़
आगामी काळात गावागावातील युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे़ हे काम केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे़ मतदारसंघातील हा तिसरा मेळावा आहे़ यातून जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न आहे़ विधानसभा निवडणुकीत जे गाव पुढे राहिल त्या गावाला संधी मिळेल़ असेही ते म्हणाले़
भोकर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरला नसून पक्ष देईल त्या उमेदवाराला आपल्या सर्वांचे सहकार्य राहिल असेही खा़ चव्हाण यांनी स्पष्ट केले़
आ़ अमरनाथ राजूरकर यांनी यावेळी युवक काँग्रेसचे महत्व सांगताना खा़ चव्हाण यांनी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून काम केले़ त्यावेळी आपण वार्डाध्यक्ष होतो़ काँग्रेसमध्ये अशा पद्धतीने कार्यकर्ते तयार होतात़ त्यांच्याच बळावर शंकररावांच्या संस्कारात वाढलेल्या जिल्ह्यात मोदी लाटही टिकली नसल्याचे आ़ राजूरकर यांनी यावेळी सांगितले़
यावेळी माजी आ़ शिवाजीराव कव्हेकर, संजय लहानकर यांचेही भाषण झाले़
या मेळाव्यात जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा मंगला गुंडिले, लातूर जि़ प़ अध्यक्ष प्रतिभाताई कव्हेकर यांचा सत्कार करण्यात आला़ प्रास्ताविक युवक काँग्रेसचे नांदेड लोकसभा अध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर यांनी केले़ उत्तर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल पावडे, बालाजी जाधव, माधव कदम, महेश देशमुख तरोडेकर, दत्तू देशमुख, अमोल डोंगरे, साई गौड, गजानन कदम, मारोती किरकन, पुरभाजी कानोडे, विक्रम क्षिरसागर, उमेश सरोदे, राजू दिवशीकर आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन नागोराव पाटील खानसोळे तर नीळकंठ मदने यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)