गोंधळानेच कॅप राऊंडची सुरुवात
By Admin | Updated: July 14, 2014 01:05 IST2014-07-14T00:54:45+5:302014-07-14T01:05:18+5:30
औरंगाबाद : अभियांत्रिकी प्रथम वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची (कॅप राऊंड) पहिली फेरी रविवारपासून सुरू झाली.

गोंधळानेच कॅप राऊंडची सुरुवात
औरंगाबाद : अभियांत्रिकी प्रथम वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची (कॅप राऊंड) पहिली फेरी रविवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर विलंबाने डाटा अपडेट झाल्यामुळे सर्व अर्ज स्वीकृती केंद्रावर (एआरसी) जवळपास २ तास विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. दुपारनंतर प्रवेशफेरी सुरळीत झाली.
अभियांत्रिकीसाठी या वर्षी नवीन प्रवेशपूर्व परीक्षा (जेईई) राबविण्यात आली. याशिवाय प्रवेश पद्धतीही नवीनच असल्यामुळे संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे गुण व इतर बाबी अपडेटिंगसाठी विलंब झाल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यातील ३५ महाविद्यालयातील १६ हजार ४५० जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दोन फेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांना महाविद्यालय व विद्याशाखांचे विकल्प (प्रिफरन्स) देता येतील. १३ ते १५ जुलैदरम्यान होणाऱ्या पहिल्या फेरीत विद्यार्थी हे कमीत कमी एक व जास्तीत जास्त १०० विकल्प देऊ शकतात. १६ जुलै रोजी विद्यार्थ्यांना गुणवत्ता व आरक्षणानुसार महाविद्यालय व विद्याशाखेचे वाटप होईल. १७ ते १९ जुलैपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. एकदा प्रवेश घेतल्यास त्या विद्यार्थ्याचे नाव दुसऱ्या फेरीत (कॅप राऊंड) येणार नाही. दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेल्या पहिल्या ७ विकल्पांमधूनच पसंतीनुसार प्रवेश घेणे बंधनकारक आहे. २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यातील ६ केंद्रांवर समुपदेशन फेरी राहील. १ ते १४ आॅगस्टपर्यंत विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश दिले जातील. १६ आॅगस्टपासून अभियांत्रिकीचे नियमित वर्ग सुरू होतील.
पालकांना झाला मनस्ताप
सकाळी १० वाजेपासून विद्यार्थ्यांनी ‘एआरसी’वर गर्दी केली होती. सुरुवातीला संकेतस्थळावर प्रवेशफेरीसंबंधीचा डाटा उघडत नव्हता. त्यामुळे रांगेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
दुपारी १ वाजेपर्यंत अनेक ‘एआरसी’वर हीच परिस्थिती होती. त्यानंतर मात्र कॅप राऊंडची प्रक्रिया हळूहळू सुरळीत सुरू झाली.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांना चांगलाच मनस्ताप झाला.