पालकमंत्र्यांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ: दानवे; त्यांना बेछूट आरोपांची सवय: शिरसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:37 IST2025-11-14T12:35:59+5:302025-11-14T12:37:05+5:30
या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ: दानवे; त्यांना बेछूट आरोपांची सवय: शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीसाठी मतदारयादीत घोळ केल्याचा आरोप करीत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला टीकेचे लक्ष्य केले. या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी सांगितले.
जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी काही राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींसाठी मतदारयाद्यांमध्ये घोळ घालण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी मतदारयाद्या अंतिम करण्यात आल्या असताना शिरसाट यांच्या मुलीचे नाव यादीत टाकण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी अर्ज करण्यात आला. बीएलओने राजकीय दबावाखाली हे नाव समाविष्ट केल्याचे दानवे म्हणाले.
पवारांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा
वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात वाद झाला. यावेळी अजित पवार यांनी ‘पार्थवर गुन्हा दाखल झाला तर आपण सरकारमधून बाहेर पडू’, असा इशारा दिल्याची माझी माहिती आहे. कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला. उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून वागणूक न देता त्यांना संशयित गुन्हेगार म्हणूनच वागवले पाहिजे.
दानवेंना बेछूट आरोपांची सवय : शिरसाट
दानवे यांनी केलेल्या आरोपाची पालकमंत्री शिरसाट यांनी खिल्ली उडविली. ते म्हणाले, त्यांना बेछूट आरोप करण्याची सवय लागली आहे. नवमतदार नोंदणी आणि मतदार स्थलांतर या निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. माझ्या मुलीचे नाव दोन ठिकाणी यादीत नसावे, यासाठी नाव स्थलांतर केले आहे. यासाठी आयोगाकडून रीतसर प्रक्रिया समजून घेतली, आयाेगाने याबाबत मला पत्र देखील दिले. ही प्रक्रिया दानवेंना समजत नसेल तर अवघड आहे.