व्हायरल आणि कोरोनाचा फरकच कळत नसल्याने नागरिकांची घाबरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 12:45 IST2020-11-27T12:39:39+5:302020-11-27T12:45:32+5:30

ढगाळ हवामान आणि थंडीमध्ये झालेली वाढ या वातावरणातील बदलाने विषाणूसंसर्गाचा अनेकांना त्रास होत आहे.

Confusion among citizens as they do not understand the difference between viral and corona | व्हायरल आणि कोरोनाचा फरकच कळत नसल्याने नागरिकांची घाबरगुंडी

व्हायरल आणि कोरोनाचा फरकच कळत नसल्याने नागरिकांची घाबरगुंडी

ठळक मुद्देतीन दिवसांपेक्षा अधिक काळ लक्षणे दिसल्यास करा कोविड तपासणीथंडी वाढल्याने सर्दी, खोकला, किंचितसा ताप, असे आजार डोके वर काढतात

औरंगाबाद : दिवाळीमध्ये निवांत झालेले अनेक जण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार, या वार्तेने धास्तावलेले आहेत. अशातच थंडी सुरू झाल्याने सर्दी, पडसे, खोकला, अशा व्हायरल आजारांनीही डोके वर काढले आहे; परंतु आपल्याला झालेली सर्दी ही कोरोनाची आहे की, वातावरणातील बदलामुळे आहे, यातला  फरक कळत नसल्याने अनेक जणांची घाबरगुंडी उडाली आहे.

दोन दिवस असलेले ढगाळ हवामान आणि थंडीमध्ये झालेली वाढ या वातावरणातील बदलाने विषाणूसंसर्गाचा अनेकांना त्रास होत आहे. एरवी अत्यंत सामान्य आजार म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाची धास्ती असल्याने घशात होणारी खवखव किंवा झालेली सर्दीही कोरोनाचीच आहे की काय, याची नाहक भीती अनेकांना वाटत आहे. त्यामुळे आपल्यामध्ये दिसून येणारी लक्षणे ही कोरोनाची आहेत, की संसर्गाची, हे न कळल्याने अनेक जण चिंतेत आहेत. सांधेदुखी, कफ या आजारांचे रुग्णही सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. थंडीच्या दिवसांत सकाळी चालणे किंवा व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी आवर्जून गरम कपडे  परिधान करावेत, तसेच दररोजच्या आहारात कडधान्याचा  समावेश करावा. काकडी, दही व थंड पदार्थांचे अतिसेवन टाळावे, असा सल्लाही  डॉक्टरांनी दिला आहे. 

कोरोना लक्षणांकडे लक्ष ठेवा
थंडी वाढल्याने सर्दी, खोकला, किंचितसा ताप, असे आजार डोके वर काढतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे या आजारांची सर्वसामान्यांमधील भीती वाढली आहे. घसादुखी, सर्दी, नाक गळणे, खोकला जर तीन दिवस औषधी घेऊनही कमी झाला नाही, तर कोविड तपासणी करणे गरजेचे आहे. यासोबतच जर खूप ताप, अंगदुखी, अशक्तपणा, अशी लक्षणे असतील तर मात्र त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घशात खवखव जाणवताच दिवसातून तीन वेळेस वाफ घेऊन सर्दी लवकर आटोक्यात आणावी. - डॉ.  नीलेश लोमटे

Web Title: Confusion among citizens as they do not understand the difference between viral and corona