थकबाकीदारांच्या १९ भूखंडांची जप्ती
By Admin | Updated: December 24, 2016 00:58 IST2016-12-24T00:56:07+5:302016-12-24T00:58:23+5:30
माजलगाव : करार तत्वावर विक्री केलेल्या भूखंडांचे भाडे नोटीस बजावूनही जमा न करणाऱ्या १९ जणांना गुरूवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगलाच दणका दिला.

थकबाकीदारांच्या १९ भूखंडांची जप्ती
माजलगाव : करार तत्वावर विक्री केलेल्या भूखंडांचे भाडे नोटीस बजावूनही जमा न करणाऱ्या १९ जणांना गुरूवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगलाच दणका दिला. या सर्व भूखंडांची कृउबाने जप्ती केली असून, कारवाई झालेल्यांमध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने फुले पिंपळगाव शिवारातील मोंढ्यामध्ये ३० वर्षे करारावर जवळपास ७५० भूखंड व्यापारासाठी दिले होते. मागील १० वर्षांपासून काही भूखंड धारकांनी भाड्याची रक्कम कराराप्रमाणे अदा केली नाही. बाजार समिती प्रशासनाने थकबाकीदार व्यापाऱ्यांना वारंवार नोटीस बजावल्या. मात्र, या नोटिसांना १९ जणांनी थारा दिला नाही. परिणामी, कृउबाने गेल्या आठवड्यात अंतिम नोटीस बजावली होती. याउपरही व्यापाऱ्यांनी थकबाकी जमा केली नाही. त्यामुळे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी पंचनामे करून १९ भूखंड जप्त केले आहेत. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन कोटी रूपये थकित
कृउबाने ७५० भूखंड करार तत्वावर विक्री केले होते. त्यापैकी ५०० जणांनी नियमित भाडे अदा केलेले नाही. थकबाकीचा आकडा दोन कोटी रूपयांच्या घरात आहे. ५०० थकबाकीदार असताना केवळ १९ जणांवरच कारवाई कशी ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या संदर्भात कृउबाचे सचिव डी. बी. फुके म्हणाले की, बाजार समितीशी करार झाले होते तेव्हा नियमावली घालून दिली होती. मात्र, काही व्यापाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्लॉटची विक्री केली. कर्मचारी दोषी आढळले तर कारवाई करू. (वार्ताहर)