६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण

By Admin | Updated: July 25, 2014 00:29 IST2014-07-25T00:19:57+5:302014-07-25T00:29:12+5:30

उमरगा : तालुक्यात खरिपाच्या एकूण ७२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या.

Complete the sowing of 64 thousand 359 hectare area | ६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण

६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण

उमरगा : तालुक्यात खरिपाच्या एकूण ७२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, बहुतांश क्षेत्रात पेरलेले उगवलेच नसल्याने तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
तालुक्यात खरिपाचे एकूण ७२ हजार २०० हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. खरीप पेरणीमध्ये प्रामुख्याने उडीद, तूर, मुग, सोयाबीन, संकरित ज्वारीचा पिकांचा समावेश असतो. यंदा पावसाने उशिरा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी मागील दहा दिवसांपासून पेरणीस प्रारंभ केला आहे. उमरगा, मुरुम, मुळज, नारंगवाडी, दाळींब या कृषी विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेऱ्याला यावर्षी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. परंतु, पेरणी झालेल्या काही क्षेत्रातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग या उगवून आलेल्या पिकांच्या वाढीसाठी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने या कोवळ्या पिकांची वाढ खुंटू लागली असून, कुंभारीवारा व कडक ऊन यामुळे उगवलेली पिके धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत फक्त १३१.६० मि.मी. पाऊस झाला आहे. झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सरासरी ६ हजार ९१० हेक्टर क्षेत्रापेक्षा ३१९.२४ हेक्टर क्षेत्रात २३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनच्या पेरण्या केल्या आहेत. तर तालुक्यातील ७० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याच्या लेखी तक्रारी येथील तालुका कृषी कार्यालयाकडे केल्या आहेत. १५० एकर क्षेत्रातील पेरण्यात आलेले सोयाबीन उगवले नसल्याची प्राथमिक माहितीची नोंद झाली असली तरी या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याची शक्यता पुढे येत आहे.
तीन समित्यांमार्फत पंचनामे
पेरणी करुन उगवून न आलेल्या तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, बियाणे प्रतिनिधी, विद्यापीठ प्रतिनिधी, कृषी सहायक अशा सहा सदस्यीय तपासणी पथकाच्या एकूण तालुक्यात तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. येथील तालुका कृषी कार्यालयाकडे दाखल झालेल्या एकूण ६० तक्रारींचे पंचनामे या समितीमार्फत करण्यात येऊन अहवाल कार्यालयास दाखल केला आहे. (वार्ताहर)
पेरणी यंत्राचा प्रयोग यशस्वी
शेतमजुरांची बचत होऊन पेरणी सुलभ व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने तालुक्यातील १६२ शेतकऱ्यांना अनुदानित १६२ पेरणी यंत्रे मंजूर झाली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४८ शेतकऱ्यांना पेरणी यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी यंत्राद्वारे केलेल्या पेरणीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे कृषी अधिकारी हणमंत गोरे यांनी सांगितले.
तात्काळ तक्रारी दाखल करा
यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उगवण क्षमतेत घट झाली आहे. काही भागातील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तक्रारदार शेतकऱ्यांच्या पेरणी क्षेत्राचे विनाविलंब पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयाला तात्काळ लेखी तक्रार अर्ज करावेत, तक्रारदार शेतकऱ्यांच्या बियाणे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार आहेत. तसेच पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीक विम्याचा भरणा करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हणमंत गोरे, मंडल कृषी अधिकारी मुरली जाधव यांनी केले आहे.
नुकसान भरपाई तात्काळ द्या
तूर, सोयाबीन, हायब्रीड, ज्वारीची पेरणी केलेल्या न उगवलेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना आ. ज्ञानराज चौगुले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Web Title: Complete the sowing of 64 thousand 359 hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.