एमपीएससी मार्फतच घ्याव्यात स्पर्धा परीक्षा; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा एल्गार
By विजय सरवदे | Updated: January 16, 2024 17:49 IST2024-01-16T17:48:55+5:302024-01-16T17:49:12+5:30
विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांत होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

एमपीएससी मार्फतच घ्याव्यात स्पर्धा परीक्षा; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा एल्गार
छत्रपती संभाजीनगर : तलाठी भरतीसह वेगवेगळ्या नोकर भरती परीक्षा तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षांत पेपर फुटी प्रकरणांमुळे दहा-दहा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहेे. त्या प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत करावी व यापुढे सर्व स्पर्धा परीक्षा खाजगी संस्थांऐवजी ‘एमपीएससी’च्या मार्फतच घ्याव्यात, असा एल्गार संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी क्रांतीचौकात पुकारला.
विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांत होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्पर्धा परीक्षांची तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी सकाळी साडेअकरा वाजेपासून जमा झाले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना मांडल्या. तलाठी स्पर्धा परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करुन शासनाने दोषींना स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतून आजन्म हद्दपार करावे, असा सूर या आंदोलनात निघाला. ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, शेतमजुरांची मुलं स्पर्धा परीक्षेची दहा- दहा तास अभ्यास करीत आहेत. मात्र, ऐन परीक्षांमध्ये काही मंडळी पेपर फोडतात. पैसे घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखवतात, याचा शासनाने शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी. मागील पाच- सात वर्षांपासून नोकरीच्या अपेक्षेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षांतील घोटाळ्यामुळे भ्रनिराश होत आहे. अनेकांचे आई- वडिला आपल्या मुलाच्या भवितव्याकडे आस लावून बसले आहेत, त्यांना न्याय मिळण्यासाठी परीक्षा घोटाळे करणाऱ्या समाजकंटकांविरूद्ध शासनाने कठोर पाऊले उचलावीत, दरवर्षी भरती प्रक्रिया राबवावी, फेलोशिपचा पेपर का व कोणी फोडला, याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे, अशा भावना विद्यार्थी नेते प्रकाश उजगरे, राहुल मकासरे, सिद्धार्थ पानबुडे, सचिन वाघमारे, धम्मा मिसाळ, चंचल जगताप, दीपाली पाटील, किरण अंभोरे, आदींनी मांडली.
यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे व बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तलाठी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, ही परीक्षा ‘एमपीएससी’द्वारे घेऊन महिनाभराच्या आत निकाल जाहीर करावा व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.