मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कमी दरानेच नुकसानभरपाई; रद्द केलेला GR पुन्हा लागू होणार का?
By विकास राऊत | Updated: September 9, 2025 15:05 IST2025-09-09T15:05:47+5:302025-09-09T15:05:47+5:30
माझ्या काळात ४५ कोटींची नुकसानभरपाई दिली होती: उपमुख्यमंत्री शिंदे

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कमी दरानेच नुकसानभरपाई; रद्द केलेला GR पुन्हा लागू होणार का?
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी मुख्यमंत्री असताना ४५ हजार कोटींची भरपाई दिली होती, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ चा जीआर रद्द केला, तो पुन्हा लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार काय, या प्रश्नाचे उत्तर देणे खुबीने टाळले. यामुळे यंदा शेतकऱ्यांना जुन्या अर्थात कमी दराने नुकसानभरपाई मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना जानेवारी २०२४ चा नुकसानभरपाईचा जीआर गैरलागू केल्याप्रकरणी ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारले असता, सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.
मराठवाड्याची सद्य:स्थिती
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात सुमारे १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मदतीचे निकष बदलून दुप्पट दराने नुकसानभरपाईचा निर्णय झाला होता. तो निर्णय जून २०२५ मध्ये विद्यमान सरकारने बदलला. मार्च २०२३ च्या निर्णयाप्रमाणे नुकसानभरपाईचे दर लागू केल्यामुळे यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळणार आहे. पेरणीसह बियाणे, खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली असताना जुन्या दरामुळे मिळणारी भरपाई तुटपुंजी असेल.
किती असेल फरक?
२०२३ च्या निर्णयाप्रमाणे नुकसानभरपाई दिल्यास ती साधारणत: ११०० कोटी रुपयांची मिळेल. तर २०२४ च्या जीआरप्रमाणे भरपाई मिळाली तर ती १७०० कोटींपर्यंत आकडा जातो. सुमारे ६०० कोटींचा फरक या दोन जीआरमध्ये आहे.
मराठवाड्यात यंदा झालेले पिकांचे नुकसान असे......
जिरायत....१२ लाख ३६ हजार ३०१ हेक्टर.......
बागायत...३ हजार ८९ हेक्टर
फळपीक...६ हजार ८७८ हेक्टर
एकूण.....१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टर
नुकसानीचा प्रकार ...........१ जाने. २०२४ चा निर्णय...................यंदाची नुकसानभरपाई या दराने
जिरायत......................१३६०० रु. प्रति हेक्टर, ३ हेक्टरपर्यंत............८५०० रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.
बागायत......................२७ हजार रु. प्रति हेक्टर, ३ हेक्टर मर्यादेत.........१७ हजार रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.
बहुवार्षिक पिके................३६ हजार रु.प्रति हेक्टर ३ हेक्टर मर्यादेत.....२२५०० रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.
किती गावांतील किती शेतकऱ्यांचे नुकसान..?
जिल्हा.......................गावे................शेतकरी............किती पंचनामे
छत्रपती संभाजीनगर.......५५................४०६६..................६१ टक्के
जालना.....................१८४................२७६५९...............०० टक्के
परभणी....................३१९................१४३१३५.................८२ टक्के
हिंगोली......................७०३.............१७२५७७.................७८ टक्के
नांदेड.........................१३२६.........६५५४१५...................७० टक्के
बीड..........................२०६...............४२८९५.................७० टक्के
लातूर......................७८२................३६४५५१................०.५९ टक्के
धाराशिव...................३६४.................१६७७३५...............४३ टक्के
एकूण......................३९२९...............१५७८०३३...............४५ टक्के