corona virus in Aurangabad : दिलासादायक ! टेस्टिंग वाढवताच रुग्णसंख्या झपाट्याने कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:58 IST2021-04-17T18:55:25+5:302021-04-17T18:58:31+5:30
corona patients decreases in Aurangabad City महापालिका प्रशासनाने मागील काही दिवसांपासून मेगा लसीकरण मोहीमसुद्धा सुरू केली आहे.

corona virus in Aurangabad : दिलासादायक ! टेस्टिंग वाढवताच रुग्णसंख्या झपाट्याने कमी
औरंगाबाद : मार्च महिन्यात औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या. गुरुवारी जवळपास सहा हजार तपासण्या केल्यानंतर शुक्रवारी ६३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे.
औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधील रुग्णसंख्या दररोज जवळपास दोन हजारांपर्यंत जात होती. रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी महापालिका प्रशासक यांनी दररोज १० हजार नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे दररोज ५ ते ६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी ५ हजार ८६२ संशयित रुग्णांची तपासणी केली असता शुक्रवारी ६३८ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. शहरासाठी ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. महापालिका प्रशासनाने मागील काही दिवसांपासून मेगा लसीकरण मोहीमसुद्धा सुरू केली आहे.
या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संसर्ग कमी होण्यासाठी हेसुद्धा एक कारण असण्याची शक्यता आहे. शहरात सध्या ८ हजार ४०३ सक्रिय रुग्ण आहेत. शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी मराठवाडा, जळगाव, बुलडाणा, वाशीम, अहमदनगर, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून पडत आहे. शहरात आणखी सीसीसी सेंटर, डीसीएचसी बेड, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन केंद्रे वाढविण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. महापालिका शहरात १० सीसीसी केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था करणार आहे. १ हजार बेडवर ही व्यवस्था राहणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे शासनाने काही जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाने कळविले आहे.
शहरात झपाट्याने कमी होत असलेली रुग्णसंख्या
एप्रिल - रुग्णसंख्या
१० - १,०८७
११ - ७२०
१२ - ७७७
१३ - ८१३
१४ - ७७१
१५ - ७६७
१६ - ६३८