दिल्सादायक ! कोरोनाच्या गंभीर रुग्णांत 77 टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 16:05 IST2020-12-07T16:03:07+5:302020-12-07T16:05:21+5:30
गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक चित्र सरकारी रुग्णालयांत पाहायला मिळत आहे.

दिल्सादायक ! कोरोनाच्या गंभीर रुग्णांत 77 टक्के घट
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वत्र भीती व्यक्त होताना गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक चित्र सरकारी रुग्णालयांत पाहायला मिळत आहे. एकट्या घाटीत दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या ७७ टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी, गंभीर रुग्ण कमी झाल्याने शहरातील सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजनचा वापर पूर्वीच्या तुलनेत सध्या ३० टक्क्यांखाली आला आहे.
जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याने चिंता व्यक्त झाली; परंतु सध्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे पहायला मिळत आहे. आजघडीला घाटी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांची संख्या शंभराखाली आहे. घाटीत २४ सप्टेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या रेकाॅर्ड ब्रेक म्हणजे तब्बल २३० होती; परंतु त्यानंतर घाटीत दाखल रुग्णांची संख्या कमी होत गेली. घाटीत शनिवारी गंभीर ५३ रुग्ण भरती होते. पूर्वीच्या तुलनेत ७७ टक्के रुग्ण कमी झाले असून, सध्या केवळ २३ टक्के गंभीर रुग्ण दाखल आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. तर ३०० खाटांची सुविधा असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ ४६ रुग्ण भरती आहेत. यात केवळ ३ रुग्ण आयसीयूत दाखल असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.
पूर्वी १४ हजार, आता रोज ४ हजार लिटर
घाटी रुग्णालयात पूर्वी रोज १४ हजार लिटर ऑक्सिजन लागत होता. त्यासाठी २४ तासांत दोन ऑक्सिजन टँकर येत होते. आता मात्र, केवळ रोज ४ हजार लिटर ऑक्सिजन लागत आहे. दोन दिवसाला एकदा टँकर येत असल्याचे डॉ. राजश्री सोनवणे यांनी सांगितले.
१२० वरून आता २० ते ३० सिलिंडर
जिल्हा रुग्णालयात आधी रोज जवळपास १२० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. आजघडीला रोज २० - ३० सिलिंडर लागत आहेत. ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांवर आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.