अयोध्येला चला; प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत, ऑनलाइन अर्ज कसा कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:33 IST2025-02-08T17:32:45+5:302025-02-08T17:33:06+5:30
काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना?

अयोध्येला चला; प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत, ऑनलाइन अर्ज कसा कराल?
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातून आठशे ज्येष्ठांनी अयोध्या दर्शन केले आहे, पण सध्या ही योजना ठप्प आहे. योजना सुरू झाल्यापासून फक्त एकदाच ज्येष्ठांना ही संधी मिळाली. त्यामुळे ही योजना विधानसभा निवडणुका जिंकण्यापुरतीच होती की काय, अशी चर्चा ज्येष्ठांमध्ये सुरू झाली आहे.
काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना?
विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेली ही योजना आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे या योजनेचे नाव असून त्यात अयोध्या दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. यात प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत होते.
जिल्ह्यातून आठशे ज्येष्ठांनी घेतले अयोध्या दर्शन
६ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून रेल्वे गाडीने आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्या दर्शनाला गेले होते. पाच दिवसांचा हा दौरा होता. त्यांचा प्रत्येकी ३० हजार रुपये खर्च आला.
निकष काय?
६० किंवा ६० हून अधिक नागरिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ७५ पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठाने सहायकाची मागणी केल्यास तशी सोय उपलब्ध करून देता येते. काहीजणांनी याचा लाभ घेतला.
ऑनलाइन अर्ज कसा कराल?
गतवर्षी आलेले अर्ज ऑफलाईनच घेण्यात आले होते. ते जवळपास पाच हजारांहून अधिक आले होते. तेच अर्ज सध्या प्रलंबित आहेत.
अयोध्या दर्शनप्रमाणेच हज यात्रा व बुद्ध गया दर्शनाची मागणी आहे; परंतु सध्या शासनाचे पुढील आदेश नाहीत. त्यामुळे अर्ज घेणे वगैरे काही सुरू नाही.
- समाजकल्याण कार्यालयातील संबंधित टेबलप्रमुख.