१०० रुपयांच्या नोटांची कलर प्रिंट चलनात; औरंगाबादेत बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्थ
By राम शिनगारे | Updated: September 15, 2022 17:56 IST2022-09-15T17:56:11+5:302022-09-15T17:56:23+5:30
सहा जणांना ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेच्या कारवाईत २५ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

१०० रुपयांच्या नोटांची कलर प्रिंट चलनात; औरंगाबादेत बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्थ
औरंगाबाद : १०० रुपयांच्या खऱ्या नोटांची कलर प्रिंट काढून बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीची पर्दाफाश गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. हे रॅकेट चालविणाऱ्या सहा जणांना बेड्या ठोकल्या. तर एक आरोपी फरार झाला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी सात आरोपींच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकास एक व्यक्ती दुचाकीवर (एमएच २० एफवाय ९६७९) बनावट नोटा खऱ्या म्हणून वापरण्यासाठी शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि. शिंदे यांच्या पथकाने सापळा लावला. औरंगपुरा भागातुनच दुचाकीवर पथक नजर ठेवुन होते. हनुमंत अर्जुन नवपुते (रा. घारदोनगाव, ता. औरंगाबाद) व किरण रमेश कोळगे (रा. गाडीवाट, ता. औरंगाबाद) या दोघांना शिवाजीनगर येथे पकडले.
या दोघांची चौकशी केल्यानंतर ते धानदोनगाव येथे बनावट नोटांची छपाई करीत असल्याचे स्पष्ट झाले. यासाठी त्यांना चरण गोकुळसिंग शिहरे (रा.घारदोन), प्रेम गोकुळ शिहरे (रा.सदर) हे मदत करीत होते. छापलेल्या नोटा संतोष विश्वनाथ शिरसाठ (रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन) आणि हारुण खान पठाण (रा.बायजीपुरा) यांच्याकडे १०० रुपयांच्या २५७ नोटा सापडल्या. या सहा जणांच्या ताब्यातुन १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमालही पथकाने जप्त केला.
या सहा जणांचा साथीदार अंबादास ससाणे याच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात आणण्याचे रॅकेट चालविण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले. ही कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, अश्वलिंग होणराव, विशाल पाटील, विलास मुठे, रविंद्र खरात, नितीन देशमुख, आनंद वाहुळ, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.