पाकिटे घेऊनही दिला महाविद्यालयाला ‘नो ग्रेड’; संस्थाचालकाची विद्यापीठाकडे तक्रार
By राम शिनगारे | Updated: December 27, 2025 15:25 IST2025-12-27T15:20:43+5:302025-12-27T15:25:01+5:30
महाविद्यालयाच्या पाहणीनंतर निघताना एका सदस्याच्या अतिआग्रहामुळे तब्बल ५० हजार रुपयांचे प्रत्येकी पाकीट दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पाकिटे घेऊनही दिला महाविद्यालयाला ‘नो ग्रेड’; संस्थाचालकाची विद्यापीठाकडे तक्रार
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जालना जिल्ह्यातील एका महाविद्यालयात गेलेल्या चार सदस्यीय समितीने आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम ठोकत प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पाकीट घेतले. त्यानंतरही महाविद्यालयास ‘नो ग्रेड’ शेरा दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संस्थाचालकाने थेट कुलगुरूंची भेट घेत समितीची तक्रार केली. त्यानुसार अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. त्यास विद्यापीठ प्रशासनाने दुजाेरा दिला आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ४१८ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यात १५७ महाविद्यालयांना कोणताही ग्रेड दिला नाही. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील एक महाविद्यालय १५ वर्षांपासून असून, तेथे सर्व सुविधा असल्याचा दावा संस्थाचालकाने केला. या महाविद्यालयाच्या तपासणीसाठी चार सदस्यीय समिती गेल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था जालना शहरातील आलिशान हॉटेलमध्ये केली. महाविद्यालयाच्या पाहणीनंतर निघताना एका सदस्याच्या अतिआग्रहामुळे तब्बल ५० हजार रुपयांचे प्रत्येकी पाकीट दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पाकीट घेऊन गेल्यानंतरही समितीने महाविद्यालयास कोणताच ग्रेड दिला नाही. त्यामुळे संतप्त संस्थाचालकाने कुलगुरूंकडे तक्रार केल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकशी समितीची स्थापना
संस्थाचालकाने कुलगुरूंकडे तक्रार नोंदवताच ही तक्रार अधिष्ठाता मंडळाकडे पाठविली. अधिष्ठाता मंडळाच्या २० डिसेंबरला झालेल्या बैठकीत प्रस्ताव क्र. १३ नुसार सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर तक्रारीच्या चौकशीसाठी अधिष्ठाता डॉ. वैशाली खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीत शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नलिनी चोंडेकर आणि विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पगारे यांचा समावेश आहे. याविषयी अध्यक्ष डॉ. खापर्डे म्हणाल्या, अधिकृत पत्र मिळाल्यानंतर समितीच्या कामकाजाला सुरुवात होईल.
विद्यापीठातील दोघांचा समावेश
पाकीट घेतल्याचा आरोप केलेल्या समितीचा अध्यक्ष विद्यापीठाच्या एका विभागातील प्राध्यापक आहे, तर सदस्यांमध्ये विद्यापीठातील एक प्राध्यापक, पैठण तालुक्यातील एका महाविद्यालयातील प्राध्यापक आणि एक सदस्य हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नामांकित महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. समितीमधील दोन सदस्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आरोप फेटाळले. महाविद्यालयांमध्ये विविध कामांसाठी गेलेल्या समितीला पाकीट देण्याची संस्कृती खोलवर रुजली असून, त्यास आमदार, माजी मंत्र्यांचे महाविद्यालयही अपवाद ठरत नसल्याचे समजते.