समाजकल्याणच्या रोख लाभाला कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:20 IST2017-07-13T00:18:27+5:302017-07-13T00:20:46+5:30

आखाडा बाळापूर : जि.प. समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनेत वस्तूऐवजी रोख रक्कम खात्यात जमा करण्याच्या बदलाचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे.

Collapse of Social Welfare Cash | समाजकल्याणच्या रोख लाभाला कोलदांडा

समाजकल्याणच्या रोख लाभाला कोलदांडा

आखाडा बाळापूर : जि.प. समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनेत वस्तूऐवजी रोख रक्कम खात्यात जमा करण्याच्या बदलाचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे. वस्तू पुरवण्याऐवजी पैसे खर्च करून बिल सादर करण्याचा बदल पूर्णत: फसला आहे. जिल्ह्यात पिको मशीन व टीनपत्र्यांच्या ४८२ पैकी केवळ १३८ लाभार्थ्यांनाच लाभ मिळाला आहे. तर ४० लाखांच्या निधीपैकी १२ लाख ११७६० रुपये खर्चाविना पडून आहेत.
या योजनेत टीनपत्रासाठी २० लक्ष रुपयाचा तर पिको शिलाई मशीनसाठी २० लक्ष असा एकूण ४० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. २०१६-१७ साठी पिको शिलाई मशीनसाठी १४९ लाभार्थ्यांची तर टीनपत्रासाठी ३३३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना मशीन व टीनपत्रे हे वस्तु रुपात वाटले जायचे; परंतु ५ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णयाप्रमाणे यातील लाभार्थ्यांना वस्तुरूपाने लाभ देण्याऐवजी रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे वस्तूरुपात लाभ देण्याऐवजी लाभार्थ्यांनी त्या वस्तू खरेदी करून त्यांचे बीले कागदपत्रांसह कार्यालयात जमा केल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रोखीने लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या ४८२ असली तरी प्रत्यक्षात लाभ उचलणारे केवळ १३८ लाभार्थीच ठरले.
पिको शिलाई मशीनसाठी १४९ लाभार्थी पात्र ठरल्यानंतरही केवळ ५२ लाभार्थ्यांनीच लाभ उचलला. टीनपत्रासाठी ३३३ लाभार्थी पात्र ठरले पण केवळ ८६ लाभार्थीच लाभ उचलू शकले. त्यामुळे पिको शिलाई मशीनसाठीच्या २० लाख रुपयाच्या निधी पैकी ६ लाख ९५७६० रुपयेच खर्च झाले तर टीनपत्रासाठीच्या २० लाखाच्या निधीपैकी केवळ १२ लाख ११७६० रुपयेच खर्च झाले तर एकूण प्रक्रियेत २७ लाख ८८२४० एवढा मंजूर निधी खर्चाविना शिल्लक आहे.
व्यक्तीगत लाभाच्या योजनेतील बदलामुळे ३४४ पात्र लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे हा बदल लाभार्थ्यांसाठी जाचक ठरला असून योजना फेल करणारा ठरला आहे.

Web Title: Collapse of Social Welfare Cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.