नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अंदाजपत्रकात मंजूर निधी वापरण्यास आचारसंहितेत मुभा: खंडपीठ
By प्रभुदास पाटोळे | Updated: March 29, 2024 17:56 IST2024-03-29T17:55:52+5:302024-03-29T17:56:22+5:30
गौतमनगर आणि श्रीनिकेतन कॉलनीतील सांडपाण्याचे काम करण्याचे मनपाला निर्देश

नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अंदाजपत्रकात मंजूर निधी वापरण्यास आचारसंहितेत मुभा: खंडपीठ
छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अंदाजपत्रकात मंजूर निधी वापरण्यास आचारसंहितेमुळे बाधा येणार नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जोशी यांनी गौतमनगर आणि श्रीनिकेतन कॉलनीतील सांडपाण्याचे काम करण्याचे मनपाला निर्देश दिले.
हॉटेल अमरप्रीतमधील सांडपाणी परिसरातील गौतमनगर आणि श्रीनिकेतन कॉलनीत उघड्या गटारांमध्ये सोडण्यात येत असल्याने नागरिकांनी याविरुद्ध खंडपीठात याचिका दाखल केली आहे. संबंधित समस्या सोडविण्यासाठी मंजूर केलेला निधी लोकसभेच्या आचारसंहितेमुळे वापरता येणार नसल्याचे मनपाने सांगितले होते. खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश देऊन हॉटेल अमरप्रीतला नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
हॉटेल अमरप्रीतचे सांडपाणी कॉलनीत येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी केली आहे. खंडपीठाने यासंबंधी माहिती घेण्याचे निर्देश मनपाला दिले होते. महापालिकेने पाहणी केल्यानंतर अमरप्रीत हॉटेलजवळ प्रक्रिया केंद्र असल्याचे सांगण्यात आले. हॉटेल पाण्यावर प्रक्रिया करून खुल्या नाल्यांमध्ये सोडून देते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. संबंधित पाण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज लाईन मनपाच्या मुख्य वाहिनीला जोडण्याचा सल्ला मनपाने दिला. त्यासाठी मनपाने परवानगी दिली असून, ९ फेब्रुवारीला काम सुरू करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या कामास आणि मोठ्या व्यासाची पाइपलाइन टाकण्यास विरोध केला.
जालना रस्त्याकडील भागाला संबंधित ड्रेनेज लाईन जोडण्यात यावी, असे सुचविण्यात आले. यासाठी मनपाने ९ लाख ९४ हजार रुपये मंजूर केले असल्याचे मनपाचे वकील संभाजी टोपे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. अंदाजपत्रकात समावेश करून लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने कार्यारंभादेश देऊ शकत नसल्याचे खंडपीठात निवेदन केले.