'मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे हस्तक होऊ', एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 19:15 IST2022-09-12T19:15:11+5:302022-09-12T19:15:57+5:30
'सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते, पण आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला पुरून उरले.'

'मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे हस्तक होऊ', एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचा सहकारी होऊ, असे शिंदे म्हणाले.
'...मोदींचे हस्तक होऊन'
पैठणच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे कौतुक केले. शिंदे म्हणाले की, 'निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मतं मागितले होते. लोकांनी भाजप-सेनेला सत्तेत आणले, पण यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. भारताचा शत्रू असलेल्या मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण यांच्याच काळात झाले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे हस्तक होऊ.'
'पन्नास आमदार पुरून उरले'
शिंदे पुढे म्हणाले, 'आमच्यावर साबणाचे बुडबुडे अशी टीका विरोधक करत होते. पण, याच साबनाने आम्ही तुमची धुलाई केली. बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. पण, आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला अन् मविआला पुरून उरले. पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. आम्ही लोकभावनेचा मान ठेवला,' असंही शिंदे म्हणाले.