सफाई कामगारांची ‘गोलाई’तील पहाट...
By Admin | Updated: July 22, 2014 00:15 IST2014-07-21T23:46:59+5:302014-07-22T00:15:54+5:30
सितम सोनवणे , लातूर गंजगोलाईतील दुकानदार, हातगाडा व्यापारी, भाजीविक्रेते, बेशिस्त नागरिकांनी केलेला कचरा उचलण्यासाठी पहाटे ४.३० पासून महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी गोलाईत दिसतात़

सफाई कामगारांची ‘गोलाई’तील पहाट...
सितम सोनवणे , लातूर
गंजगोलाईतील दुकानदार, हातगाडा व्यापारी, भाजीविक्रेते, बेशिस्त नागरिकांनी केलेला कचरा उचलण्यासाठी पहाटे ४.३० पासून महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी गोलाईत दिसतात़ हँडग्लोज, बुट व मास्कशिवाय झाडून कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याचा विचार मात्र स्थानिक प्रशासनाकडून होत नाही. ‘स्वच्छ व सुंदर लातूर’साठी या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गंजगोलाईत फेरफटका मारला असता पूर्ण गोलाईत जागोजागी वापरलेल्या कॅरिबॅग्ज, कुजत पडलेला भाजीपाला, कागदांचे तुकडे अशी अस्वच्छ गोलाई दिसत होती. या अस्वच्छतेमुळे मोठ-मोठे डास घोंघावताना दिसून आले. तसेच कुजत पडलेल्या भाजीपाल्यांवर मोकाट जनावरे ताव मारताना दिसून आले. जनावरांच्या अंगावर व भाजीपाल्यांवर घोंघावणाऱ्या माशा दिसून येत होत्या. त्यातच कालचा रविवार असल्यामुळे ही घाण जास्तच साचली होती.
मागील बऱ्याच दिवसांपासून बंद असणारे पथदिवे पहाटे चालू असल्याने गोलाई लख्ख प्रकाशाने उजळून निघाली होती. पोलिस चौकी सताड उघडी होती. पण त्यामध्ये एक बाकडे, घोंघावणारे डास, माशा याशिवाय कोणीच नव्हते. पहाटेची तुरळक नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती. शहानवाज सय्यद हे आपली पानटपरी उघडून ग्राहकांची वाट बघत होते. बस, दुचाकी, टेम्पो यांची ये-जा चालू झाली होती. बाजूला महेमूद चौधरी यांनी आपले हॉटेल उघडून साफसफाई सुरू केली होती. त्यात हत्तेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अस्वच्छतेची सफाई करणारी एक महिला दिसून आली. त्यांच्याशी चर्चा केली असता शानूरबी तांबोळी या गांधीनगरच्या रहिवासी असल्याचे सांगितले. या मागील बारा वर्षांपासून सफाईचे काम करीत आहेत. त्यात हा ‘रोजा’चा महिना असल्याने घरी ३ वाजताच उठून स्वयंपाक आदी कामांचे नियोजन करून पहाटे ४.३० वाजता मुलगा गोलाईत सोडून कामावर निघून जातो. त्यांना ठरवून दिलेल्या रस्त्याच्या साफसफाईचे काम सुरू होते. बाजूच्या रस्त्यालाच मणकर्णाबाई शेवाळे याही स्वच्छता करीत होत्या.
गंजगोलाईत निर्माण झालेली घाण काढण्यासाठी खराटा हाती घेऊन मनपाचे कामगार सफाई करतात. लोकांची लगबग सुरू होण्याआधीच म्हणजे ६ वाजेपर्यंत साफसफाई पूर्ण व्हावी, याचे त्या नियोजन करतात. मनपात ६७१ सफाई कामगार काम करीत असून, त्यांच्या कामाच्या वेळा ६ ते ११ व २ ते ५ अशा आहेत़ प्रभागनिहाय त्यांचे काम चालू असते. मागील तीन महिन्यांपासून पगारी नसल्यामुळे सफाई कामगारांची उपासमार होत असल्याचे अनेकांनी सांगितले़
मागील २० वर्षांपासून सफाई कामगार म्हणून पहाटे ५ वाजेपासून साफसफाईचे काम करीत आहे़ नागरिकांच्या आरोग्याचा विचार आम्ही करीत असतोत़ मात्र आमच्या आरोग्याचा विचार कोणीच करीत नाही, अशी खंतही सफाई कामगार सुकुमारबाई लामतुरे यांनी व्यक्त केली.
गंजगोलाईतील सी-झोन प्रभाग २७, २८, २९ मधील सफाईचे कामकाज मागील १३ वर्षांपासून मी पाहत आहे. या झोनमध्ये ५० सफाई कर्मचारी आहेत. यामध्ये २० महिला, ३० पुरुष आहेत, अशी माहिती मनपाचे स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख यांनी दिली.