गायरान जमिनीवरून दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-27T00:24:02+5:302014-06-27T00:27:30+5:30
परंडा : गायरान जमिनीवरून गत सहा महिन्यांपासून सोनगिरी ग्रामस्थ व पारधी समाजात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान गुरूवारी सकाळी तुंबळ हाणामारीत झाले़

गायरान जमिनीवरून दोन गटात हाणामारी
परंडा : गायरान जमिनीवरून गत सहा महिन्यांपासून सोनगिरी ग्रामस्थ व पारधी समाजात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान गुरूवारी सकाळी तुंबळ हाणामारीत झाले़ हाणामारीदरम्यान कोयता, कुऱ्हाड, काठी, चटणीचा वापर झाल्याने सात जण गंभीर जखमी झाले़ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून १९ जणांविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
परंडा पोलिस ठाण्यात एवरेड्या पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सोनगरी गायरान जमिनीवर गुरूवारी सकाळी सुभाष नामदेव वेताळ, सुखदेव वेताळ, लक्ष्मण वेताळ, तानाजी वेताळ, रावसाहेब गणपती वेताळ, मोहन वेताळ, राजेंद्र वेताळ, विष्णू वेताळ, कृष्णा वेताळ, लक्ष्मण कुंडलिक वेताळ, महादेव खरपुडे व इतर तेहतीस जणांनी ‘तुमच्या बापाची गायरान जमीन आहे का?’ असे म्हणत चितरंग्या पवार, अत्याबाई पवार, उषा पवार, गुडी पवार, रुपाली पवार, सुषमा काळे यांना काठी, कुऱ्हाड, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले़ तर एवरेड्या पवार यांच्या दुचाकीवर दगड घालून नुकसान केले. पवार यांच्या फिर्यादीवरून सुभाष नामदेव वेताळ, सुखदेव वेताळ, लक्ष्मण वेताळ, तानाजी वेताळ, रावसाहेब गणपती वेताळ, मोहन वेताळ, राजेंद्र वेताळ, विष्णू वेताळ, कृष्णा वेताळ, लक्ष्मण कुंडलिक वेताळ, महादेव खरपुडे यांच्याविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात भादंंवि कलम ३२६, ३२४, ३२३, १४७, १४८, १४९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तसेच सुखदेव चांगदेव वेताळ यांनीही फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, सोनगिरी (ता.परंडा) येथील गायरानात सकाळी ७ च्या सुमारास रामेश्वर पाटील, दत्तात्रय वेताळ गायरानमधून शेतात जात होते़ त्यावेळी चतरंग्या वांग्या पवार, मण्याबाई पवार, उषा पवार, चिवलाबाई काळे, गुडी गणेश पवार, रुपाली पवार, सुषमा काळे, (सर्व काशीमबाग, परंडा) व इतरांनी कोयता, काठ्या घेऊन ‘तुम्ही गायरानात का आलात’ असे म्हणून शिवीगाळ करुन डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने, काठीने मारहाण करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिली. वेताळ यांच्या फिर्यादीवरुन चतरंग्या वांग्या पवार, मण्याबाई पवार, उषा पवार, चिवलाबाई काळे, गुडी गणेश पवार, रुपाली पवार, सुषमा काळे यांच्याविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, १४८, १४९, ५०४, ५०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पारवे पाटील हे करीत आहेत. या हाणामारीत सातजण गंभीर जखमी झाले असून, काहींना सोलापूर, उस्मानाबाद येथे तर काहींना परंडा येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ पोलिसांनी रात्री उशिरा यातील दोघांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले़ (वार्ताहर)
अतिक्रमणधारकांचे आंदोलन
पारधी समाजातील लोकांनी आपली मुले, जनावरांसह तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दि २२ मे रोजी ठिय्या आंदोलन करत रस्ता रोखून धरला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन हे आंदोलन हाणून पाडले होते़ यानंतर पारधी समाजातील महिलांनी प्रभारी तहसीलदार एस एस पांडळे यांच्या दालनात प्रवेश करुन घेराव घातला. गायरान जमीन कसण्यासाठी देण्याची मागणी करत जमीन न दिल्यास २ जून पासून बेमुदत उपोषण क रण्याचा इशारा दिला होता़ त्यानुसार पारधी समाजातील नागरिकांनी २ व ३ जून असे दोन दिवस उपोषण केले होते़
सहा महिन्यापासून वाद
पारधी समाजातील लोकांनी सोनगिरी येथील गायरान जमीनीवर सहा महिन्यापूर्वी अतिक्रमण केले होते़ त्यावेळी ग्रामस्थांनी गायरानवरील अतिक्रमण हटविण्याबाबत परंडा तहसीलसमोर उपोषण केले़ तेव्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अतिक्रमण हटवले होते़
कारवाईनतंर दोनच महिन्यांनी परत गायरान जमिनीवर पारधी समाजातील नागरिकांनी कब्जा करून घरे उभारली़ याविरोधात ग्रामस्थांनी पुन्हा एकत्रित येत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता़ मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़
पुन्हा कारवाई
लोकसभेची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर ग्रामस्थांनी अतिक्रमणाविरोधात यल्गार पुकारला होता़ त्यामुळे प्रशासनाने २२ मे रोजी अतिक्रमण हटविले होते़ अतिक्रमण हटविल्यानंतर ग्रामस्थांनी जमिनीची साफसफाई करून वृक्षारोपण केले होते़