औरंगाबाद भोवतीची तटबंदी होती शहराची लाईफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:12 IST2018-03-05T18:10:03+5:302018-03-05T18:12:05+5:30

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे शहरातील ऐतिहासिक वास्तूची इतिहासप्रेमींना माहिती होण्यासाठी प्रत्येक पंधरा दिवसांनी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन केले जाते. या उपक्रमातील १४ वा हेरिटेज वॉक  रंगीन दरवाजा, काळा दरवाजा आणि नौबत दरवाजा याठिकाणी पार पडला.

The city's lifeline for the walled city of Aurangabad | औरंगाबाद भोवतीची तटबंदी होती शहराची लाईफलाईन

औरंगाबाद भोवतीची तटबंदी होती शहराची लाईफलाईन

औरंगाबाद : सुरक्षेसाठी शहराला पाच प्रकारची तटबंदी होती. ही तटबंदी म्हणजेच शहराची लाईफलाईन होती, असे प्रतिपादन इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी यांनी सांगितले. शहराला एकूण पाच प्रकारची तटबंदी असल्याचेही कुरेशी यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे शहरातील ऐतिहासिक वास्तूची इतिहासप्रेमींना माहिती होण्यासाठी प्रत्येक पंधरा दिवसांनी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन केले जाते. या उपक्रमातील १४ वा हेरिटेज वॉक  रंगीन दरवाजा, काळा दरवाजा आणि नौबत दरवाजा याठिकाणी पार पडला. रंगीन दरवाजा येथे इतिहासप्रेमी जमल्यानंतर सकाळी आठ वाजता हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी यांनी सर्वांचे स्वागत करीत माहिती दिली. रंगीन, काळा आणि नौबत दरवाजा हे किलेअर्कचे दरवाजे असल्याची माहिती रफत कुरेशी यांनी दिली. हे दरवाजे औरंगाबाद शहराच्या तटबंदीची लाईफलाईन होते. बादशहा औरंगजेब यांनी १६६२ मध्ये शहराभोवती तटबंदी बांधण्याचे आदेश दिले होते. ही तटबंदी पाच प्रकारची आहे. यात मुख्य तटबंदीनंतरही किलेअर्कची तटबंदी, नवखंडा पॅलेस, बायजीपुरा महालाची तटबंदी आणि बेगमपुरा महालाची तटबंदी याचा समावेश होता.

या अंतर्गत उभारलेल्या रंगीन दरवाजात राजे, सरदार, महत्त्वाची व्यक्ती आल्यानंतर आतषबाजी करण्यात येत होती. यामुळे या दरवाजाचे नाव रंगीन दरवाजा पडले असल्याचेही रफत कुरेशी यांनी सांगितले. नौबत दरवाजाला किलेअर्कचा दरवाजा असेही म्हणतात. याठिकाणी प्रमुख अतिथी आल्यानंतर नौबत वाजविण्यात येत होती. यामुळे या दरवाजाला नौबत दरवाजा असेही नाव पडले आहे. इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी तिन्ही दरवाजांच्या स्थापत्यरचनेची माहिती दिली. या दरवाजाच्या दोन्ही बाजंूना तोफा ठेवण्याची व्यवस्था होती. शत्रूने अतिक्रमण केल्यास या तोफांचा वापर करण्यात येत असे. या दरवाजांच्या दोन्ही बाजूंना अष्टकोणी किंवा पंचकोणी बांधकाम करण्यात आल्याचेही डॉ. दुलारी कुरेशी यांनी सांगितले.

यानंतर काळा दरवाजातील मशीद, पंचकुआही इतिहासप्रेमींना दाखविण्यात आला. या परिसरात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याचेही डॉ. कुरेशी यांनी स्पष्ट केले. या हेरिटेज वॉकला डॉ. बीना सेंगर, वास्तुविशारद प्रदीप देशपांडे, लतिफ शेख, डॉ. कामाजी डक, मयुरेश खडके, डॉ. धनराज बंडे, धनंजय साखरे, उषा पाठक, पंजाबराव देशमुख, विजय जोग, प्रभाकर सोनवणे, हेमंत धर्माधिकारी, पंकज लहाणे, नीता गंगावणे आदी इतिहासप्रेमी उपस्थित होते. 

Web Title: The city's lifeline for the walled city of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.