शहर कचराप्रश्नी प्रशासनाचा आता इंदौर अभ्यास दौरा; पालकमंत्रांनी दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:54 IST2018-04-28T15:52:10+5:302018-04-28T15:54:47+5:30
सध्या देशात इंदौर सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जात आहे. तेथील प्रशासन कशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, नवीन येणारे मनपा आयुक्त व महापौर इंदौरला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

शहर कचराप्रश्नी प्रशासनाचा आता इंदौर अभ्यास दौरा; पालकमंत्रांनी दिली माहिती
औरंगाबाद : सध्या देशात इंदौर सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जात आहे. तेथील प्रशासन कशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, नवीन येणारे मनपा आयुक्त व महापौर इंदौरला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
वाल्मी येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर शहरातील कचरा प्रश्नावर पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी खा.चंद्रकांत खैैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. सावंत यांनी सांगितले की, शहरातील २५० ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. याशिवाय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणखी ४ युनिट उभारण्यात येणार आहे. कचऱ्यापासून राख तयार करण्यासाठी अंबुजा कंपनीशी बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत शहरातील कोणत्याही रस्त्यावर कचरा दिसणार नाही, याचे नियोजन मनपाने केले आहे. येत्या दोन महिन्यांत शहर स्वच्छ व सुंदर बनेल, अन्य शहरांसमोर एक आदर्श बनेल, असा आशावादही डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.