शहरात डेंग्यूसदृश साथ
By Admin | Updated: July 10, 2014 01:16 IST2014-07-10T01:06:35+5:302014-07-10T01:16:09+5:30
औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाळा लागला असून, डासांची पैदास वाढल्यामुळे तापेचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत.

शहरात डेंग्यूसदृश साथ
औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाळा लागला असून, डासांची पैदास वाढल्यामुळे तापेचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत. मनपा दप्तरी तीन महिन्यांत ४६ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असून, एन-८ मध्ये ३८ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. सभागृह नेते किशोर नागरे यांनी आज आरोग्य विभागाची बैठक घेऊन औषध फवारणीचे आदेश दिले आहेत. रुग्णांबाबत आरोग्य विभागाकडे याबाबत कोणतीही माहिती नाही.
मुकुंदवाडी, गुरुदत्तनगर, अरिहंतनगर, विवेकानंदनगर, श्रीनिकेतन कॉलनी, नाथनगर, नक्षत्रवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-८, एन-५ साईनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपूर, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा या भागांत नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मनपाने नालेसफाई तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. नागरिकांनी आठवड्यातून एकदा भांडी स्वच्छ धुऊन कोरडी करून गाळून पाणी भरावे. स्वच्छ पाणी झाकून ठेवावे. डास विरोधी साधनांचा वापर करावा. घर स्वच्छ ठेवावे. परिसरात वाढलेले गवत, झुडपे कापून टाकावीत, असे आवाहन मनपाने केले आहे.
लक्षणे
तीव्र ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, सांधे व अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, क्वचित पुरळ येणे ही डेंग्यूची, तर थंडी वाजून येणे, सतत किंवा दिवसाआड ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत.
मनपाकडील यंत्रणा
१२ फॉगिंग मशीन, २ व्हेईकल माऊंटेन, ३ फवारणी ट्रॅक्टर, ३६ औषधी फवारणी पंप, १०२ कर्मचारी मनपाच्या मलेरिया विभागाकडे आहेत.