छत्रपती संभाजीनगरातील शहर बससेवेला ७ वर्षात ३४ कोटींचा तोटा! आणखी १३६ बसेस येणार

By मुजीब देवणीकर | Updated: January 24, 2025 19:18 IST2025-01-24T19:18:17+5:302025-01-24T19:18:51+5:30

जाधववाडी येथे ७ एकर जागेवर अत्याधुनिक बस डेपो उभारण्यात येत आहे.

City bus service in Chhatrapati Sambhajinagar loses Rs 34 crore in 7 years! 136 more buses to arrive | छत्रपती संभाजीनगरातील शहर बससेवेला ७ वर्षात ३४ कोटींचा तोटा! आणखी १३६ बसेस येणार

छत्रपती संभाजीनगरातील शहर बससेवेला ७ वर्षात ३४ कोटींचा तोटा! आणखी १३६ बसेस येणार

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीने २३ जानेवारी २०१८ रोजी शहरात बससेवा सुरू केली. गुरुवारी या सेवेला ७ वर्षे पूर्ण होत आहेत. तिकीट जाहिराती इ.च्या माध्यमाने स्मार्ट सिटीला ४७ कोटी ४१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तब्बल ३४ कोटी २ लाख रुपयांचा ताेटाही सहन करावा लागला. पुढील काही दिवसांत केंद्र शासनाकडून १०० ई-बसेस देण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी करार पद्धतीवर ३६ ई-बसेस घेणार आहे.

सन २०१८पूर्वी शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. १९९० च्या दशकात ही सेवा एस. टी.कडून देण्यात येत होती. या सेवेत तोटाच अधिक सहन करावा लागत असल्याने महामंडळाने बस सेवा बंद केली. २००७ ते २०१० पर्यंत मनपाने अकोला प्रवासी वाहतूक संस्थेच्या सहकार्याने बीओटी तत्त्वावर बससेवा सुरू केली. अल्पावधीत संस्थेने गाशा गुंडाळला. २०१८मध्ये स्मार्ट सिटीने पुढाकार घेत बससेवा सुरू केली.

४७ बसेस, १० मार्ग
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारी २०१८ रोजी शहरात बससेवा सुरू केली. पहिल्या टप्प्यात ४७ बसेसद्वारे १० मार्ग निवडण्यात आले. प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत गेला.

८५ बसेस ३२ मार्ग
सध्या दररोज ८५ बसेस ३२ मार्गावर धावतात, २४ हजार प्रवासी प्रवास करतात. दररोज २२ हजार ५०० किमी बसेसच्या ९५० फेऱ्या होतात. दररोज ७ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळते. चालक, वाहकांशिवाय ६५ अधिकारी व कर्मचारी सेवेत आहेत.

७ एकरवर अत्याधुनिक बस डेपो
१) जाधववाडी येथे ७ एकर जागेवर अत्याधुनिक बस डेपो उभारण्यात येत आहे.
२) डेपोचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच केंद्र शासनाकडून १०० आणि खासगी एजन्सीच्या ३६ ई-बसेस दाखल होणार आहेत.
३) सर्व्हिसिंग सेंटर, बसेस चार्जिंग करण्याची सुविधा बसडेपोत राहणार आहे. याशिवाय अन्य खासगी वाहनेही येथे उभी करता येऊ शकतील, अशी व्यवस्था आहे.

सेवा आणखी मजबूत होईल
बससेवा भविष्यात आणखी मजबूत होईल. ही सेवा सुरू राहावी, यासाठी १०० कोटींचे डिपॉझिट ठेवलेले आहे. उत्पन्न वाढीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. मनपाकडून दरमहा ६० लाख रुपये तूट भरून काढण्यासाठी देण्यात येत आहेत.
- जी. श्रीकांत, मनपा प्रशासक

Web Title: City bus service in Chhatrapati Sambhajinagar loses Rs 34 crore in 7 years! 136 more buses to arrive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.