दूषित पाण्याने नागरिकांचे हाल

By Admin | Updated: July 6, 2014 00:13 IST2014-07-05T23:56:10+5:302014-07-06T00:13:20+5:30

मोहन बारहाते, मानवत नगरपालिकेमार्फत होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याने नागरिकांचे बेहाल होत असून, साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे़

Citizens' Hall with contaminated water | दूषित पाण्याने नागरिकांचे हाल

दूषित पाण्याने नागरिकांचे हाल

मोहन बारहाते, मानवत
नगरपालिकेमार्फत होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याने नागरिकांचे बेहाल होत असून, साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे़ खुद्द नगरसेविकेच्याच दोन मुलांना कावीळ झाल्याने मागील १५- २० दिवसांपासून त्या आपल्या मुलांच्या सेवासुश्रुषेत त्रस्त आहेत़ मानवत शहराला झरी तलावावरून पाणीपुरवठा होता़ हा पाणीपुरवठा करण्यासाठी मानवत येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे़
जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शुद्ध करून नागरिकांना वितरित करण्यात येते़ परंतु, झरीच्या तलावात असणारे पाणी गढूळ असते़ त्यामुळे त्याचे जलशुद्धीकरण होणे गरजेचे असते़ मात्र मानवतच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात पाण्याचा रंगही बदलत नाही आणि वासही बदलत नाही़ नगरपालिकेच्या वतीने या पाण्याची जलशुद्धीकरण प्रकल्पावर ओ़टी़ टेस्ट घेण्यात येते़ जलशुद्धीकरण प्रकल्पावर पाण्यामध्ये क्लोरिन टाकण्यात येते़ या क्लोरीन टाकण्यामुळे ओटी टेस्ट नेहमीच ओके येते़ परंतु, ज्यावेळी पाणी वितरित होते़ त्यावेळी मानवत शहरातील बहुतांश भागातील पाणी पिण्यासाठी आयोग्य असते़ त्याला कारणही तसेच आहे़ मानवत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचा नकाशा नगरपालिकेत अस्तित्वात नाही़
परिणामी एखाद्यास नळजोडणी द्यायची असेल तर त्यासाठी जलवाहिन्या कुठे आहेत याची माहिती नगरपालिकेत काम करणाऱ्या प्लंबरलाही नसते़ त्यामुळे नळजोडणी देताना जलवाहिनीच्या ठिकाणी अंदाजे खोदकाम होते़ हे खोदकाम होत असताना बऱ्याच वेळा जलवाहिन्यांवरच कुदळीचे घाव लागतात आणि पाईप विचित्र पद्धतीने फुटतात़ याची दुरुस्ती करण्याची कोणतीही सोय नसते़ त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात सिमेंट वगैरे टाकून पाईपाला पडलेले छिद्र बुजवले आहेत़ अशाच प्रकारे अनेक ठिकाणी छिद्रे पडून गळतीचे प्रमाण मोठे आहे़ पाणी गळतीच्या ठिकाणातून तेच पाणी पुन्हा जलवाहिन्यांमध्ये जाऊन बसते आणि नंतरच्या आवर्तनाला हेच पाणी मानवतच्या नागरिकांना वितरित होते़
साहजिकच गळतीच्या ठिकाणाहून जाणाऱ्या पाण्यातून संसर्गजन्य आजार उद्भवणार यात शंका नाही़ आजमितीस मानवत शहरात किमान शंभर ठिकाणी पाण्याची गळती होणारी ठिकाणे आहेत़
अनेक ठिकाणी जलवाहिन्या नाल्यांमधून जातात़ अशाही ठिकाणी गळतीचे प्रमाण आहेच़ परंतु, नालीतील पाण्याच्या प्रवाहाने ह्या गळतीचे प्रमाण दिसून येत नाही़ परंतु, या गळतीमधून दूषित पाणी जलवाहिन्यांमध्ये शिरते आणि तेच वितरित होते़ ही परिस्थिती केवळ जुन्या गावातच नाही तर शहरात नवीन झालेल्या वसाहतीमध्येही दिसून येते़
याशिवाय शहराच्या विविध भागांना पाणी वितरित करण्यासाठी व्हॉल्वची व्यवस्था करण्यात आली आहे़ परंतु, या व्हॉल्वमधूनही पाण्याची गळती आणि पुन्हा हेच पाणी जलवाहिन्यांमध्ये शिरते़ याविषयी अनेकवेळा नागरिकांनी तक्रारी केल्या. ग्रामीण रुग्णालयामार्फत होणाऱ्या पाणी तपासण्यातून आणि जिल्हा प्रयोगशाळेतून दूषित पाण्याचे अहवाल येऊनही नगरपालिका प्रशासन यावर गांभिर्याने विचार करीत नाही़ नगरपालिकेच्या २५ टक्के उत्पन्नातून या गळतीवर लाखो रुपये खर्च झाले आहेत़ मात्र गळती काही थांबली नाही़
गळती पाईपला लागली, पाण्याला लागली, पैशाला लागली की नगरसेवकांच्या इच्छाशक्तीला लागली हे कळायला मार्ग नाही़ पण, गळती थांबत नाही हेही तेवढेच सत्य आहे़ परंतु, या गळतीचा परिणाम सरळसरळ नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे़
गळतीच्या संदर्भात डॉ़ लहुकुमार सोळंके यांच्याची चर्चा केली असता ते म्हणाले, आमच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत़ मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये सात ते आठ ठिकाणी पाण्याची गळती जलवाहिन्यांतून होत आहे़
परिणामी माझ्या मुलांनाही कावीळ झाला आहे़ गेले दहा दिवस व्हायरल इन्फेक्शन झाले आणि दहा दिवसानंतर मुलांना कावीळ झाल्याचे लक्षात आले़ दहा दिवसांपासून आमच्या मुलांवरच काविळाच्या आजारावर उपचार चालू आहेत़ जिथे नगरसेवकांच्याच घरी दूषित पाणीपुरवठा होते तिथे सर्वसामान्य नागरिकांना चांगले पाणी मिळणार कुठून? असा प्रश्नही निर्माण होतो़
पाणी रे पाणी तेरा रंग कैसा?
जुन्या काळात चित्रपटातील एक गीत ‘पाणी रे पाणी तेरा रंगे कैसा जिसमे मिलाव लगे उस जैसा’ हे सर्वसामान्यांच्या ओठावर असायचे़ परंतु, मानवत नगरपालिकेच्या पाण्याने जुने ते सोने असे म्हणल्या जाणाऱ्या गाण्याला आणि त्याच्या शब्दरचनेला छेद दिला आहे़
झरी तलावातील पाणी दिसायला पिवळसर रंगाचे असते़ शिवाय त्याला दुर्गंधीही असते़ मानवतच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात हे पाणी आल्यानंतर त्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर त्याचा रंग आणि चव बदलायला पाहिजे़
लाखो रुपये खर्च करून सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या हितासाठी तयार केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातही झरीच्या पाण्याचा रंग बदलत नाही आणि पाणी रे पाणी तेरा रंग कैसा असे कोणी म्हणले की दुसरा लगेच म्हणतो झरीतील तलावा जैसा़ म्हणजे ऩप़ प्रशासनाच्या कृपेने मानवतच्या पाण्याला रंगही आला आहे.

Web Title: Citizens' Hall with contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.