१३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला नागरिकांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:59 IST2021-05-15T17:57:40+5:302021-05-15T17:59:29+5:30
crime news in Aurangabad रिकव्हरी एजंट पीडितेच्या घरी कर्जाचे हप्ता नेण्यासाठी जात असतो.

१३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला नागरिकांनी दिला चोप
औरंगाबाद : नामांकित बॅंकेच्या कर्जवसुली एजंटाने १३ वर्षीय मुलीला ‘आय लव्ह यू’ची चिठ्ठी देऊन तिचा विनयभंग केला. यावेळी प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरड केल्यामुळे शेजारील लोकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही घटना गुरुवारी सकाळी मुकुंदवाडी परिसरात घडली.
अण्णा सांडू शेपूट (३०,रा. मयूरपार्क) असे आरोपीचे नाव आहे. तो एचडीएफसी बॅंकेचा वसुली एजंट आहे. तो नेहमी बॅंकेच्या थकबाकीदार कर्जदाराकडून हप्ते वसुलीचे काम करतो. पीडितेच्या घरी तो कर्जाचे हप्ता नेण्यासाठी जात असतो. तो १३ मे रोजी सकाळी १०:३० वाजता मुकुंदनगरात पीडितेच्या घरी गेला. यावेळी पीडितेचे आई, बाबा घरी नव्हते. ही संधी साधून त्याने अचानक तिला प्रेमपत्र दिले. त्याने तिचा हात पकडला आणि तिला तो ‘आय लव्ह यू’ म्हणाला. या प्रकाराने मुलगी घाबरून गेली आणि तिने आरडाओरड करून त्याच्या हाताला झटका देऊन हात सोडून घेतला. तिने शेजाऱ्यांना बोलविले.
संधी मिळताच त्याने ती चिठ्ठी फाडून टाकली. शेजाऱ्यासह इतर लोक मदतीला धावले तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीत होता. लोकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना कळवून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाइकांनी आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला. फौजदार सुनील चव्हाण यांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपी शेपूटला दोन दिवस कोठडी सुनावली.
आरोपी उच्च शिक्षित
आरोपी अण्णा शेपूट याचे एम.ए., बी.एड.पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षकाची नोकरी न मिळाल्याने बॅंकेत वसुली एजंट म्हणून काम करतो. चार महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असल्याचे सूत्राने सांगितले.