गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला सिडको पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:46 IST2020-03-02T18:42:51+5:302020-03-02T18:46:20+5:30
गस्तीवर असताना मिसारवाडी येथे दोन दुचाकीवरून तीन ते चार जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली

गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला सिडको पोलिसांनी पकडले
औरंगाबाद : १० हजार रुपये प्रतिकिलो दराने गांजा विक्री करणाऱ्या तिघांना सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. १९ किलो गांजासह एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
वीरेंद्रसिंग महेंद्रसिंग परदेशी (२२, रा. जयभवानीनगर), शुभम ऊर्फ बबलू गौतम मोरे (१९, रा. न्यू हनुमाननगर) आणि रामलाल ऊर्फ दीपक सरदार बारेला (१९, रा. बोराजंटा, ता. चोपडा, जि. जळगाव) अशी अटकेतील गांजा तस्करांची नावे आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शोध पथक रविवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना मिसारवाडी येथे दोन दुचाकीवरून तीन ते चार जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली.
पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, कर्मचारी सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, दिनेश बन, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, रोहिदास खैरनार, लालखाँ पठाण, स्वप्नील रत्नपारखी, किशोर गाढे, विशाल सोनवणे, चालक योगेश म्हस्के यांनी दोन पंचांसमक्ष आरोपींना पकडण्यासाठी पिसादेवी ते मिसारवाडी रस्त्यावर सापळा रचला.
यावेळी दोन दुचाकीवरून गोण्या घेऊन तीन ते चार जण येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहून वाहने वळवून ते माघारी सुसाट जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर दुचाकीवरील गांजाची गोणी टाकून आरोपी वेगात निघून गेला तर अन्य दुचाकीवरील तीन जण आणि गांजाची गोणी पोलिसांच्या हाती लागली. पंचांसमक्ष आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळील गोण्याची तपासणी केली. गोण्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या गांजाचे वजन १९ किलो भरले. गांजासह आरोपींची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. आरोपींविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आहेर तपास करीत आहेत.
‘ते’ ठोक विक्रेते
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून हा गांजा आणल्याचे सांगितले. महाविद्यालयीन तरुण आणि गांजा ओढण्याचे व्यसन असलेल्या लोकांना किरकोळ दहा ते वीस ग्रॅमची पुडी विक्री करणाऱ्यांना ते ठोक दहा हजार रुपये प्रतिकिलो दराने गांजा विक्री करतात.