छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:40 IST2025-07-02T18:35:23+5:302025-07-02T18:40:06+5:30

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे काम संपले आहे.

CIDCO now only for NOC in Chhatrapati Sambhajinagar; Will work on other schemes in the department | छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम

छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महापालिका आणि वाळूज महानगर १, ३ व ४ यांसह झालर क्षेत्रातील २६ गावांतून सिडकोचे पॅकअप झाले आहे. आता शहरात सिडको फक्त एनओसीपुरतेच राहिले आहे. जालना व विभागातील इतर योजनांवर सिडको काम करणार आहे. मराठवाड्यात जालन्यातील खरपुडी (न्यू टाऊन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) वगळता सिडकोकडे काहीही काम राहिलेले नाही.

सिडकोची वाळूज महानगर १, २ व ४ यांसह झालर क्षेत्रातील नियोजनाची जबाबदारी गेल्या आठवड्यात राज्य शासनाने संपुष्टात आणल्यानंतर २६ गावांतील १५ हजार हेक्टर जागेसह वाळूजचे १, २ व ४ महानगर झालर क्षेत्र छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (सीएसएमआरडीए) वर्ग करण्याचा निर्णय घेतला. ‘सिडको’कडे जमा असलेला ९० कोटींचा कर शासनाच्या सूचनेप्रमाणे वर्ग होईल. झालरच्या २६ गावांसह वाळूज महानगर १, २ व ४ ची सेवासुविधांची जबाबदारी प्राधिकरणाकडे असेल.

शहरात कधी आले सिडको
१९८०च्या दशकात सिडको शहरात आले. ११०० हेक्टरमध्ये १५ वसाहतींमध्ये गृहनिर्माण, व्यावसायिक प्रकल्प सिडकोने उभारले. २००६ साली सिडको वसाहतींच्या सेवासुविधांचे मनपाकडे हस्तांतरण झाले. २०२५ मध्ये सिडकोचे २६ गावांसाठी झालर क्षेत्र विकास आराखडा आणि वाळूज महानगरमधून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम संपले.

सिडकोकडे लॅण्डबँक मोठी
सिडकोकडे लॅण्डबँक मोठी आहे. संपादित केलेल्या जमिनींवर २०८ कोटींतून इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम अभियांत्रिकी विभाग करेल. वाळूजमध्ये संपादित जागेचे ले-आऊट करून ती विकसित करेल. सिडकोकडे लीजवरील मालमत्तांची संख्या मोठी आहे. त्या मालमत्ता ६ वर्षांत विकसित केल्या नाही, तर अतिरिक्त भाडेपट्टा वसुलीचे काम सिडकोकडे असेल. बांधकाम परवानगी प्राधिकरण अथवा मनपाकडून घ्यायची असेल, तर एनओसी सिडकोची लागेल. १०० टक्के फ्रीहोल्ड होत नाही ताेवर सिडकोकडे वरील कामे असणार आहेत. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे काम संपले आहे.

२०८ कोटींची कामे सिडकोच करणार
सिडको वाळूज महानगरातील २०८ कोटींची कामे करणार आहे. ती कामे होण्यास किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत सिडकोकडे शासन आणखी जबाबदारी सोपवील. एनओसी देणे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे, शिल्लक असलेले प्लॉट विकण्याचे काम सिडको करील.
- भुजंग गायकवाड, प्रशासक सिडको

Web Title: CIDCO now only for NOC in Chhatrapati Sambhajinagar; Will work on other schemes in the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.