कुपोषणामुळे बालके अस्वस्थ !

By Admin | Updated: January 23, 2017 23:47 IST2017-01-23T23:46:51+5:302017-01-23T23:47:28+5:30

उस्मानाबाद प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवरही मेळघाटासारखीच विदारक परिस्थिती असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Children are unwell due to malnutrition! | कुपोषणामुळे बालके अस्वस्थ !

कुपोषणामुळे बालके अस्वस्थ !

बाबूराव चव्हाण उस्मानाबाद
कालपर्यंत ठाणे, गडचिरोली आदी जिल्ह्यातील कुपोषित चिमुरड्यांच्या बातम्या आपण दूरचित्रवाणीवर पहात होतो. मात्र, केवळ प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवरही मेळघाटासारखीच विदारक परिस्थिती असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या उस्मानाबादपासून अवघ्या आठ-नऊ किलोमिटरवर असलेल्या उपळे (मा) येथील शाहुनगरमध्ये एक -दोन नव्हे, तर तब्बल आठ ते नऊ चिमुरडे कुपोषणाच्या दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात आहेत. मात्र, महिला व बालकल्याणच्या माध्यमातून या चिमुकल्यांसाठी कोट्यवधीचा निधी खर्च करणाऱ्या प्रशासनाला याचा थांगपत्ताही लागलेला नाही. उपळ्याच्या शाहुनगरमधील या कुपोषित बालकांपर्यंत शासनाचा ना महिला व बालकल्याण विभाग पोहोंचला ना आरोग्य विभाग. लातूरस्थित एका डॉक्टरने या बालकांची तपासणी केल्यानंतर स्वत:च्या लेटरपॅडवर महिला व बालकल्याण विभागाला तेथील वास्तव कळविले. मात्र, आठवडा उलटला तरीही ना बालकल्याण विभागाने दाखल घेतली ना प्रशासनातील इतर यंत्रणेला तेथे जावेसे वाटले.
कुपोषणाचा कलंक पुसला जावा, यासाठी शासनस्तरावरून विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी योजना या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविल्या जातात. परंतु, उस्मानाबाद तालुक्यातील उपळे (मा) येथील वडर शाहुनगर भागातील कुपोषणाशी झुंज देणारी बालके पाहिल्यानंतर योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या शिवाय रहात नाही. शहरापासून अवघ्या ९ किमी अंतरावर असलेल्या या गावांतील बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळू शकत नसेल, तर दुर्गम भागातील खेडेगावांचा विचार न केलेलाच बरा.
औरंगाबाद-सोलापूर या महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर उपळे (मा) हे गाव आहे. या गावालगतच शाहुनगरचा भाग आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणारी बहुतांशी कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर चालतो. पद्माबाई कराळे यांचे यापैकीच एक कुटुंब. मोलमजुरीला गेले तरच चुल पेटते. याच्या कुटुंबातील आदिनाथ कराळे हा दहा वर्षीय मुलगा कुपोषणाशी झुंजत आहे. या दहा वर्षीय मुलाचे वजन सात ते आठ किलो असल्याचे कुटुंबियाकडून सांगण्यात आले. कुपोषणामुळे या मुलाला स्वत:ची कामेही स्वत: करता येत नाहीत. आई-वडीलांनाही कामावर गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे दिवसभर आदिनाथचा सांभाळ करण्याची जबाबदारी वृद्ध आजीवर येवून ठेपली आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी दवाखान्यात जावून उपचार घेता आले नाहीत. अन् शासनाकडूनही ना पोषण आहार मिळाला ना औषधी. सुरूवातीच्या काळात जिल्हा रूग्णालयातही चकरा मारल्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची प्रतिक्रीया आदिनाथच्या आईने नोंदविली.
हाच प्रश्न अंबिका जाधव यांच्या कुटुंबाला भेडसावित आहे. कुटुंबात गोपाळ जाधव (वय-३) आणि आरती जाधव (वय-७) ही भावंडे आहेत. यांनाही कुपोषणाने ग्रासले आहे. मुलांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कधी शासकीय रूग्णालय तर कधी खाजगी दवाखान्याचे उंबरठे झिजविले. परंतु, शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे अंबिका जाधव यांचे म्हणणे आहे. आरती सात वर्षाची आहे. मात्र अशक्तपणामुळे तिला स्पष्टपणे बोलता येत नाही. गोपाळची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. हतबल झालेल्या जाधव कुटुंबियाने देवावर भरवसा ठेवून कोणाच्या तरी सांगण्यावरून मुलाच्या गळ्यात कापडामध्ये लिंबू बांधल्याचे दिसून आले.
याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, मात्र प्रशासन ढुंकूनही पहात नाही. खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीत. मग देवावर भरवसा ठेवण्याशिवाय करणार काय? असा प्रतिसवाल प्रस्तूत प्रतिनिधीला केला. ही प्रातिनिधीक स्वरूपातील उदाहरणे असून आणखी आठ ते नऊ बालके मध्यम तसेच तीव्र कमी वजनाची आहेत. त्यामुळे हा प्रकार महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग गांभीर्याने घेणार कधी? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.

Web Title: Children are unwell due to malnutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.