चिकुन गुनियाची ३३ जणांना बाधा
By Admin | Updated: August 6, 2014 02:28 IST2014-08-06T01:01:16+5:302014-08-06T02:28:46+5:30
कळंब : तालुक्यातील कन्हेरवाडी गावावर चिकुन गुनियाच्या साथीचे सावट पसरले

चिकुन गुनियाची ३३ जणांना बाधा
कळंब : तालुक्यातील कन्हेरवाडी गावावर चिकुन गुनियाच्या साथीचे सावट पसरले असून, मंगळवारी येथील अंगणवाडीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या उपचार केंद्रात २९ जणांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी १२२ व्यक्तींची सर्वसामान्य तपासणी केली असता आणखी चार जणांमध्ये चिकुन गुनियाची लक्षणे आढळून आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मंगळवारी ‘चिकुन गुनियाचा कन्हेरवाडीत उद्रेक’ या शिर्षकाखालील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच प्रशासन खडबडून जागे झाले. जवळपास सहाशे उंबरठा व पाच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी हे गाव. चिकुन गुनियाच्या साथीमुळे मागील तीन दिवसापासून ग्रामस्थ त्रस्त आहेत. सोमवारी १२६ व्यक्तींनी तपासणी केली होती. त्यापैकी २९ व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे जाणवल्याने त्यांच्यावर ईटकूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अंगणवाडीमध्ये उपचार सुरू करण्यात आले. मंगळवारी या उपचार केंद्रात १२२ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये नव्याने चार रुग्णांमध्ये चिकुन गुनियाची लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे या साथीचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३ झाली आहे. दरम्यान आरोग्य विभागाचे डॉ. प्रताप इगे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी सध्या साथ नियंत्रणात असल्याचे सांगितले.