आग लावायला छत्रपती संभाजीनगरकर रोज वापरतात ८० हजार काडीपेट्या
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 4, 2025 18:00 IST2025-12-04T17:56:08+5:302025-12-04T18:00:02+5:30
देशात विकल्या जाणाऱ्या काडीपेट्यांपैकी ९० टक्के काडीपेट्या तामिळनाडूमध्ये तयार केल्या जातात.

आग लावायला छत्रपती संभाजीनगरकर रोज वापरतात ८० हजार काडीपेट्या
छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस शेगडी असो की मोठी भट्टी, त्यांना प्रज्वलित करण्यासाठी अलीकडे सर्रासपणे लायटरचा वापर केला जातो. तरीही विस्तव पेटविण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणात काडीपेटीचा वापर केला जात आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, शहरात दररोज किती काडीपेट्या विकल्या जात असतील? छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज तब्बल ८० हजार ‘माचिस’ विकल्या जातात.
छोट्या आगपेटीचा मोठा व्यवसाय
आगपेटीचा आकार जरी लहान असला तरी त्याचा व्यवसाय मोठा आहे. फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातच महिन्यात सुमारे २४ लाख नग आगपेट्यांची विक्री होते. एका बॉक्समध्ये ६०० आगपेट्या असतात, त्यामुळे महिनाभरात सुमारे ४,००० बॉक्स विकले जातात.
३० आणि ५० काड्यांची आगपेटी
एखाद्या आगपेटीत किती काड्या असतात हे तुम्हाला माहीत आहे का? बाजारात काडीपेटी मुख्यत्वे दोन प्रकारच्या उपलब्ध आहेत. ३० काड्यांची आगपेटी १ रुपयाला तर ५० काड्यांची आगपेटी २ रुपयांना विकली जाते. यापैकी ९० टक्के काडीपेट्या ५० काड्यांच्या विकल्या जातात. शहरात काडीपेटीमध्ये चार ते पाच ब्रँड्सचा समावेश आहे.
- संतोष नावंदर, वितरक
काडीपेटीची किंमत कशी वाढली?
वर्ष किंमत (एक नग)
१९५० - ५ पैसे
१९९४ - ५० पैसे
२००७ - १ रुपया
२०२१ - २ रुपये
काडीपेटीसाठी लागतो १४ प्रकारचा कच्चा माल
काडीपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल आवश्यक असतो. यामध्ये लाल फॉस्फरस, मेण, कागद, स्प्लिंट्स, पोटॅशिअम क्लोरेट आणि सल्फर यांचा प्रामुख्याने वापर होतो.
९० टक्के काडीपेट्या बनतात तामिळनाडूत
देशात विकल्या जाणाऱ्या काडीपेट्यांपैकी ९० टक्के काडीपेट्या तामिळनाडूमध्ये तयार केल्या जातात. त्यामध्ये शिवकाशी, विरुधुनगर, गुडियाथम आणि तिरुनेलवेली ही महत्त्वाची उत्पादन केंद्रे आहेत.
संक्षिप्त माहिती
१) ३१ डिसेंबर १८२७ रोजी ब्रिटनमध्ये जगात पहिल्यांदा काडीचा शोध लागला.
२) जॉन वॉकर या शास्त्रज्ञाने काडी तयार केली.
३) भारतात काडीपेटीचे उत्पादन १८९५ मध्ये सुरू झाले.
४) काडीपेटीचा पहिला कारखाना अहमदाबादमध्ये आणि नंतर कोलकातामध्ये सुरू झाला.
८० हजार काडीपेट्यांची विक्री