छत्रपती संभाजीनगर : शहराचा विस्तार झपाट्याने चारही दिशेने होतोय. लोकसंख्या वाढू लागली आहे. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या जशास तशी आहे. सध्या शहराला किमान १५ उपकेंद्रांची गरज भासत असताना पाच केंद्रांवर काम सुरू आहे. १० वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने शहरात पाच नवीन उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यातील दोनच केंद्र सुरू झाले. उर्वरित तीन कागदावरच आहेत. मागील काही दिवसांत मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग लागली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वेळेवर अग्निशमन बंब पोहोचले असते तर नुकसान कमी झाली असते.
शहरात मागील वर्षी छावणी येथे एका दुकानाला आणि पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अग्निशमन विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अलीकडेच शहागंज, गुलमंडी, राजा बाजार या भागांमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला होता. या विलंबामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. दोन ते अडीच किमी अंतरात अग्निशमन उपकेंद्र असावेत असे निकष आहेत. दहा वर्षांपूर्वी मनपाने शहरात पाच उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल, कांचनवाडी, टी.व्ही. सेंटर, एन-९, पडेगाव येथेही उपकेंद्र उभारणीची घोषणा केली होती. एन-९, कांचनवाडी येथील केंद्राचे काम पूर्ण झाले. हे उपकेंद्र वापरातही आहेत.
शहागंजचा आराखडा तयार होतामहापालिकेच्या अग्निशमन विभागाने २०२१ मध्ये खास व्यापाऱ्यांसाठी शहागंज परिसरातील जलकुंभाजवळ उपलब्ध मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा तयार केला होता. अग्निशमन दलासाठी दोन गाड्या व आवश्यक मनुष्यबळासह लघु केंद्र उभारण्याची तयारी होती. परंतु, निधीअभावी, जागेच्या मालकीविषयक अडचणी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे पुढील पाऊलच उचलले गेले नाही.
कंत्राटी फायरमनची संख्या अधिकअग्निशमन विभागात सध्या १५० कर्मचारी आहेत. त्यामध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त ५०, तर कंत्राटी पद्धतीवर १०० जणांची नेमणूक केली आहे. किमान ३०० कर्मचाऱ्यांची या विभागाला गरज आहे.
पाच उपकेंद्र सुरूसध्या शहरात कुठेही आग लागली तर जवळच्या उपकेंद्रातून बंब पाठविण्यात येतात. यात पदमपुरा, सेव्हन हिल, चिकलठाणा, कांचनवाडी, एन-९ येथील केंद्रांचा समावेश आहे.
दोन महिन्यांतील आगीच्या प्रमुख घटना-५ मार्चला नारेगाव येथील सहा गोदाम आगीत भस्मसात झाली.- २० मार्चला आझाद चौकातील फर्निचरची अनेक दुकाने आगीत भस्मसात.- ८ एप्रिलला देवगिरी किल्ल्याला आग, पर्यटक, नागरिकांमध्ये खळबळ.-१० एप्रिलला ग्रँड सरोवर हॉटेलला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान.- १ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसीमधील सनराईज इंटरप्राईजेस कंपनी खाक.
केंद्र उभारणीचे प्रयत्नमहापालिकेच्या निधीतून हळूहळू उपकेंद्र उभारणे सुरू आहे. पडेगाव, शहागंज, हर्सूल, आदी भागात केंद्र सुरू होतील. नवीन विकास आराखड्यात अनेक ठिकाणी आरक्षणे आहेत. भविष्यात जागा प्राप्त होताच अनेक उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील.- संपत भगत, अग्निशमन प्रमुख, मनपा.