छत्रपती संभाजीनगर महापालिका ११ हजार घरे बांधणार; ऑनलाईन अर्जास झाली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:43 IST2025-12-08T19:43:01+5:302025-12-08T19:43:37+5:30
अर्जदाराला आता घर कुठे पाहिजे, पाच हजार रुपये अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

छत्रपती संभाजीनगर महापालिका ११ हजार घरे बांधणार; ऑनलाईन अर्जास झाली सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेत महापालिका ११ हजार १२० घरे बांधून देणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वर्धापनदिनापासून म्हणजेच ८ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा देण्यात येत आहे. अर्जदाराला आता घर कुठे पाहिजे, पाच हजार रुपये अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
सुंदरवाडी गट क्र. ९ व १०, तिसगाव येथे गट क्र. २२५/१ व २२७/१, पडेगाव येथे गट क्र. ६९, हर्सूल येथे गट क्र. २१६ अशा चार ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ११ हजार १२० घरे बांधण्यात येत आहेत.
‘म्हाडा’प्रमाणे घरकुल वाटपासाठी लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. महापालिकेकडे आतापर्यंत ४० हजार लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले. आता पुन्हा एकदा लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. मनपाचा ८ डिसेंबरला वर्धापन दिवस असून, त्या दिवशीही ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा आहे. त्यासाठी शनिवारी मनपाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ऑनलाइन अर्जामध्ये अर्जदाराची माहिती, विविध कागदपत्रे, बँक डिटेल्स, पाच हजार रुपये अनामत आदी माहिती मागविण्यात येणार आहे. घर कुठे पाहिजे, याचाही उल्लेख अर्जात करावा लागेल. अर्ज भरण्यासाठी ७०९ रुपये खर्च येईल. एका सदनिकेचे चटई क्षेत्र ३२२ चौरस फूट राहणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत केंद्र आणि राज्य शासनाचे २ लाख ६० हजार रुपये सदनिकेच्या किमतीत कमी करण्यात येतील.
कोणत्या प्रकल्पात किती घरे?
प्रकल्प ठिकाण------------------- किंमत -------------------घर संख्या
पडेगाव गट क्र. ६९---------------- ९ लाख ५६ हजार -------------६७२
सुंदरवाडी गट क्र. ९ व १० ---------- ९ लाख २६ हजार------------- ३,२८८
तिसगाव गट क्र. २२५/१-------------९ लाख २६ हजार ------------- १,९७६
तिसगाव गट क्र. २२७/१---------- ९ लाख ४४ हजार--------------४,६८०
हर्सूल गट क्र. २१६----------------- ९ लाख ४४ हजार --------------५०४
एकूण-------------------------- ११,१२०