छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातून कामासाठी पुण्याला जातो असे सांगून निघालेला तरुण सहा दिवसांनी छत्रपती संभाजीनगरात आढळून आला. बुधवारी सायंकाळी हा तरुण क्रांती चौकातील उड्डाणपुलावरून कोसळला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी तो पडला. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात नेल्यामुळे त्याचे प्राण वाचल्याची माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली. जखमी तरुणाचे प्रदीप परते (३०, रा. मध्य प्रदेश) असे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप सहा दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून पुण्याला जातो, असे सांगून घरातून निघाला होता. मात्र, तो पुण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरात आला. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने आणि खिशात पैसे नसल्याने त्याची उपासमार होत होती. इकडे कुटुंबीय चिंतेत होते, तर त्याचे मित्रही त्याच्या शोधात शहरात आले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रदीप अचानक उड्डाणपुलावरून खाली कोसळला. तो थेट शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याजवळ पडला. पुलाखाली कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे अंमलदार अलियार पठाण, कैलास वाघ, दुल्लत आणि मेहर यांनी तात्काळ डायल ११२ ला कळविले. बघ्यांची मोठी गर्दी जमली.
क्रांती चौक ठाण्याच्या उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के, सहायक फौजदार रमेश गायकवाड, हवालदार अनिल पवार यांनी प्रदीपला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. त्याच्या कमरेला आणि पायाला जबर मार लागला असून, डोक्याला दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के यांनी प्रदीपच्या आईशी फोनवरून संपर्क साधला असता, त्याचे मित्र त्याला शोधण्यासाठी शहरातच असल्याचे समजले. पोलिसांनी त्या मित्रांना तात्काळ घाटी रुग्णालयात बोलावून घेतले. प्रदीपचा भाऊ नागपूरहून येत असून, तो आल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रदीपचा जबाब नोंदवल्यानंतरच तो पुलावरून पडला की त्याने उडी मारली, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची क्रांती चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Web Summary : A man from Madhya Pradesh, missing for five days, was found injured in Chhatrapati Sambhajinagar after falling from a bridge. He was en route to Pune. Police are investigating the incident to determine if it was an accident or a suicide attempt, and his family has been notified.
Web Summary : पांच दिनों से लापता मध्य प्रदेश का एक व्यक्ति छत्रपति संभाजीनगर में पुल से गिरने के बाद घायल पाया गया। वह पुणे जा रहा था। पुलिस दुर्घटना या आत्महत्या के प्रयास के रूप में जांच कर रही है और उसके परिवार को सूचित कर दिया गया है।