छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर हे शहर आमच्या हृदयात आहे. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी कधीच काही कमी पडू देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरकरांना आश्वासित केले.
हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राची तब्बल ११ वर्षे मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिलेले स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते वसंतराव नाईक चौकात बोलत होते. बंजारा प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चोको पूजन करण्यात आले. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांसह सर्वच पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बंजारा कवल पट्टेही देण्यात आले.
वसंतराव नाईक हे माझे प्रेरणास्त्रोत‘जय सेवालाल’, अशी साद घालतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात केली. आणि तेवढ्याच उत्साहात त्यांना समोरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र घडत गेला, ते वसंतराव नाईक यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे. त्यांंनी हाताळलेला १९७२ चा भीषण दुष्काळ महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. जलसंधारण योजना ही नाईक यांचीच. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन आम्ही जलयुक्त शिवार योजना सुरू केली. वसंतराव नाईक हे माझे प्रेरणास्तोत्रच होते, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. बंजारा समाजाला गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सातशे कोटी रुपये खर्चून पोहरादेवीचा कसा कायापालट केला, याचा आवर्जून उल्लेख केला.
साडेतीन हजार कोटी द्याहे शहर सुंदर दिसलं पाहिजे, नुकतीच शहरातील सहा हजार अतिक्रमणे तोडण्यात आली. रस्त्याची कामं रखडली आहेत. हे शहर नजीकच्या काळात आणखी झपाट्याने वाढणार आहे. अशावेळी शहरासाठी सरकारने साडेतीन हजार कोटींचा विकास निधी उपलब्ध करून द्यावा, असा आग्रह यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री संजय शिरसाट यांनी धरला होता. मनपा प्रशाासक जी. श्रीकांत यांच्या कार्याची पालकमंत्री शिरसाट यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या पुतळ्यासाठीही त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. आणखी चांगलं काम करा, तुम्हाला आम्ही पाच वर्षे सोडणार नाही, अशी घोषणा शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच केली. आज बंजारा समाजात दिवाळी आहे. हे शहर बंजारा समाजाचेही आहे, हे अभिमानाने सांगू शकतो, असा हा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
अविनाश नाईक यांना का बोलावले नाही?या कार्यक्रमाला स्व. वसंतराव नाईक यांचे चिरंजीव अविनाश नाईक यांना का पाचारण केले नाही, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होत होती. राज्याचे ते उद्योगमंत्रीही राहिलेले आहेत. त्यांना बोलावले असते, तर या सोहळ्याची आणखी शोभा वाढली असती, अशी चर्ची होती.
बंजारा गाणी व बंजारा नृत्याची धूमप्रकाश ठाकूर व संचातर्फे विविध बंजारा गीतांची यावेळी बरसात करण्यात आली. तर, सोर गोरखनाथ राठोड यांच्या नेतृत्त्वाखाली बंजारा नृत्याची धूम सुरू होती.
प्रारंभी, जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी पुतळ्याची वैशिष्ठ्ये सांगितली. यावेळी मूर्तिकार बलराज मडिलगेकर व शीतल पहाडे आदींचा सत्कार करण्यात आला. मंचावर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आभार मानले.
राजेंद्र राठोड, रमेश पवार, डॉ. कृष्णा राठोड, विनोद जाधव, डाॅ. मुकेश राठोड, पी. एम. पवार, सचिन राठोड, राजपाल राठोड आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सिडको बसस्टॅंडला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणीही यावेळी काही जणांनी केली. तसेच, विविध निवेदनेही मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
Web Summary : Devendra Fadnavis assured unwavering support for Chhatrapati Sambhajinagar's development during Vasantrao Naik's statue unveiling. He highlighted Naik's influence and announced initiatives for the Banjara community, while a demand for additional development funds was raised. The event sparked discussion regarding the absence of Vasantrao Naik's son.
Web Summary : देवेंद्र फडणवीस ने वसंतराव नाइक की प्रतिमा के अनावरण के दौरान छत्रपति संभाजीनगर के विकास के लिए अटूट समर्थन का आश्वासन दिया। उन्होंने नाइक के प्रभाव पर प्रकाश डाला और बंजारा समुदाय के लिए पहल की घोषणा की, जबकि अतिरिक्त विकास निधि की मांग उठाई गई। कार्यक्रम में वसंतराव नाइक के बेटे की अनुपस्थिति पर चर्चा हुई।