छत्रपती संभाजीनगरची 'स्वच्छता परीक्षा': केंद्रीय पथक येणार, 'टॉप टेन'साठी मनपाची तयारी
By मुजीब देवणीकर | Updated: March 17, 2026 15:38 IST2026-03-17T15:36:46+5:302026-03-17T15:38:28+5:30
मार्चअखेर केंद्रीय पथकाची शहरात पाहणी; पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेवर मिळणार विशेष गुण

छत्रपती संभाजीनगरची 'स्वच्छता परीक्षा': केंद्रीय पथक येणार, 'टॉप टेन'साठी मनपाची तयारी
छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दरवर्षी शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक येते. यंदा हे पथक मार्चअखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची जोरदार तयारी सुरू असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहराच्या क्रमवारीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षीही १२ हजार ५०० गुणांसाठी ही स्पर्धा होत आहे.
केंद्र शासनाने गत काही वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे सर्वेक्षण होते. यंदाही मार्चअखेरीस केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीचे पथक शहरात पाहणीसाठी दाखल होईल. वॉटर प्लस, गारबेज फ्री सिटी या दोन उपक्रमांसाठी प्रत्येक १ हजार गुण दिल्या जातील. ऑन गोईंग असेसमेंट सिटीझन फिडबॅकमध्ये १ हजार ५०० गुण आहेत. शहरात कचऱ्याचे संकलन, प्रक्रिया, कचऱ्याचे उगमस्थान, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, व्यावसायिक व बाजारपेठेत कचऱ्यासाठी दोन स्वतंत्र बीन लावलेले असतात का? पब्लिक प्लेस, व्यावसायिक ठिकाणांवर मनपाचे सार्वजनिक शौचालये किती आणि कसे आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला स्ट्रॉम वॉटरची व्यवस्था? असेल तर ते सुस्थितीत आहे का? शहरात सौंदर्यीकरणासाठी कोणकोणते उपाय केले आहेत. रस्त्यांवर पेंटिंग केली आहे का? हेही बघितले जाईल.
पर्यटनस्थळांकडे यंदा लक्ष
दरवर्षी केंद्रीय पथक पर्यटन विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. यंदा पर्यटनाला विशेष असे महत्त्व दिले आहे. त्यानुसार केंद्रीय पथक पर्यटनस्थळांचीही पाहणी करेल. या ठिकाणी पर्यटकांना मूलभूत सोयीसुविधा आहेत का? याची पाहणी केली जाईल. त्यानुसार महापालिकेला गुण दिले जातील.
दरवर्षी निकषांमध्ये बदल
गतवर्षी शहराची क्रमवारी ज्या कारणांमुळे घसरली त्यावर मनपा भर देते. दुसऱ्या वर्षी केंद्र शासनाचे निकष बदलतात. जे काम केले त्याला गुण मिळत नाहीत. जे राहून गेले त्याचे गुण कापले जातात.
कचऱ्यासाठी नवीन एजन्सी
कचरा संकलनासाठी गुजरात येथील वेस्टर्न इमॅजनरी या कंपनीची नेमणूक केली. ही कंपनी १ एप्रिलपासून काम सुरू करणार आहे. यामुळे पुढील वर्षी शहराच्या क्रमवारीत बरीच सुधारणा होईल. शहर शंभर टक्के टॉप टेनमध्ये येणारच.
- नंदकिशोर भोंबे, उपायुक्त, मनपा