एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाची एका दिवसात १ कोटी ४१ लाखांची रेकाॅर्ड ब्रेक कमाई
By संतोष हिरेमठ | Updated: November 23, 2023 20:23 IST2023-11-23T20:20:42+5:302023-11-23T20:23:11+5:30
दिवसभरात १.४१ कोटीचे उत्पन्न; १.३८ लाख प्रवाशांचा प्रवास

एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाची एका दिवसात १ कोटी ४१ लाखांची रेकाॅर्ड ब्रेक कमाई
छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने एका दिवसात रेकाॅर्ड ब्रेक कमाई केली. सोमवारी दिवसभरात तब्बल १.३८ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यातून तब्बल १.४१ कोटी रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले.
दिवाळीमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. दिवाळीचा हंगाम कॅच करीत एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने विविध मार्गांवर जादा बसेस सोडल्या. प्रवासी सेवेसाठी चालक-वाहकांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाने विभागाने यंदाच्या दिवाळीत उच्चांकी उत्पन्नाचा पल्ला गाठला. विशेष म्हणजे बस, कर्मचाऱ्यांच्या तुडवट्यातही कमाई केली आहे. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिलांना प्रवास भाड्यात सवलत दिली आहे. त्यामुळेही प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होत आहे. विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, २० नोव्हेंबर रोजी एका दिवसात विनासवलत ९१ लाखांचे उत्पन्न मिळाले. सवलतीसह १.४१ कोटीचे उत्पन्न मिळाले.
एसटीची २० नोव्हेंबरची स्थिती
किलोमीटर- २,१४,१२७
विनासवलत उत्पन्न- ९१ लाख ४७ हजार ९८२ रु.
सवलतीसह उत्पन्न- १ कोटी ४१ लाख ९० हजार ४०५ रु.
प्रवासी संख्या- १ लाख ३८ हजार ४८१