छत्रपती संभाजीनगरात ३,००० घरांना पाइपलाइन गॅस सुरू; सिलिंडर बुकिंगची कटकट संपली!
By विकास राऊत | Updated: March 27, 2026 19:32 IST2026-03-27T19:32:23+5:302026-03-27T19:32:44+5:30
उद्योगांनंतर आता हॉटेल्सनाही मिळणार पाइपलाइन गॅस; शहरातील गॅस टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

छत्रपती संभाजीनगरात ३,००० घरांना पाइपलाइन गॅस सुरू; सिलिंडर बुकिंगची कटकट संपली!
छत्रपती संभाजीनगर : अमेरिका - इस्त्रायल, आखाती देशातील युद्धामुळे सध्या शहरात व्यावसायिक आणि वाहनांसाठीच्या एलपीजी गॅसचा मोठा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोलपंपांवर २ ते ३ किमीच्या रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत काही प्रमाणात का होईना, पाइपलाइन गॅसमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
शहरात पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस (पीएनजी) पुरवठा सुरू केला असून, टप्प्याटप्प्याने शहरातील १ लाख घरांना संबंधित गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या तीन हजार घरांना पाइपद्वारे याचा लाभ मिळत आहे. गारखेडा, गजानन महाराज मंदिर, ज्योतीनगर, बन्सीलालनगर आणि बीड बायपास यासारख्या भागात गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. यापैकी बीड बायपास आणि वाळूज महानगर १ या भागात पाइपलाइन टाकून गॅस पुरवठा केला जात आहे. पुढील टप्प्यात शहरातील मनपाचे झोन क्र. ७, ८ आणि ९ मध्ये पाइपलाइनचे नेटवर्क उभारण्यात येणार आहे.श्रीगोंदा ते वाळूज ते शेंद्रा असे पाइपलाइनचे नेटवर्क आहे. २५० किमीपर्यंतचे गॅस पाइपलाइन टाकण्याचे नेटवर्क १ लाख घरांना गॅस पुरविल, असा दावा बीपीसीएल करीत आहे. मार्च २०२२ पासून या योजनेचे काम सुरू झाले आहे.
पाइपलाइन गॅस सुविधेची ठळक वैशिष्ट्ये :
प्रकल्प : हा प्रकल्प केंद्र सरकारच्या शहर गॅस वितरण योजनेचा भाग आहे.
व्याप्ती : सुरुवातीच्या टप्प्यात शहराच्या मुख्य भागात आणि नंतर विस्तारित भागात काम पूर्ण करण्यात येणार आहे.
मीटर कोणत्या भागात : गारखेडा परिसर, गजानन महाराज मंदिर, ज्योतीनगर, बन्सीलालनगर, प्रतापनगर आणि बीड बायपास या भागातील सुमारे १ लाख घरांमध्ये गॅस कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे.
फायदे : सिलिंडर बुकिंगची गरज नाही, २४ बाय ७ अखंड पुरवठा आणि सुरक्षितता
प्रकल्पाची किंमत : ४ हजार ५०० कोटी
प्रकल्प कंत्राटदार : बीपीसीएल
गॅस पंपांना देखील पुरवठा सुरू
रोज ६० घरांमध्ये कनेक्शन देण्यात येत आहे. मनपाचे झोन ५, ७, ८ व ९ मध्ये पाइपलाइनचे काम सध्या सुरू आहे. वाळूज महानगर, बीड बायपास, विमानतळ परिसर, पुढील दोन महिन्यांत पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होईल. शहरातील सर्व रेल्वे क्रॉसिंग लगत पाइपलाइन टाकण्याचे काम बाकी आहे. पुढील एक महिन्यात ते पूर्ण होईल. गॅस पंपांना देखील पुरवठा सुरू आहे. साधारणतः ३ हजार घरांचे सिलिंडर बंद झाले आहेत.
- मनोज जाधव, बीपीसीएल प्रतिनिधी